ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर
श्रीरामपूर (अहिल्यानगर) | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी पत्रकार सुरक्षा समितीने 2025 चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांना जाहीर केला आहे. पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष राम हुंडारे आणि सोलापूर शहराध्यक्ष आन्सर तांबोळी (बीएस) यांनी ही माहिती दिली.
पत्रकार हितासाठी सतत संघर्ष
पत्रकार सुरक्षा समिती गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी लढा देत आहे. समान पेन्शन योजना, विमा योजना, घरकुल योजना, आरोग्य सुविधा, पत्रकारांची अधिकृत नोंदणी, तसेच वृत्तपत्र जाहिरातींवरील जाचक अटी हटवण्यासह अनेक विषयांवर समितीने आंदोलन आणि पत्रव्यवहार केले आहेत. पत्रकारांवरील हल्ले, धमक्या आणि खंडणीसारख्या गंभीर प्रकरणांबाबतही समिती आक्रमक भूमिका घेत आहे.
नंदकुमार बगाडे पाटील यांचा पत्रकारितेतील योगदान
श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील हे विविध वृत्तपत्रे आणि ऑनलाइन पोर्टल्ससाठी कार्यरत आहेत. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत, सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमीच तत्पर असतात. प्रशासनासमोर सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे विशेष योगदान आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, पत्रकार सुरक्षा समितीने त्यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरस्कार वितरण समारंभ लवकरच आयोजित केला जाणार आहे.
—