पत्रकार सुहास देसाई यांना पिकुळेत विशेष नागरी सन्मान
दोडामार्ग (प्रतिनिधी) – दोडामार्ग तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महामंडळाच्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित पत्रकार सुहास देसाई यांना पिकुळे हायस्कुलच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मुंबई हितवर्धक मंडळाच्या वतीने विशेष नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
पिकुळे हायस्कुलमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले सुहास देसाई यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचा वाटा उचलला आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव कार्य केले असून, पत्रकारिता तसेच नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे.
सुहास देसाई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा चळवळ उभारणे, तिलारी आंतरराज्य प्रकल्पामुळे बाधित पुनर्वसन गावांसाठी धरणग्रस्त समिती स्थापन करणे, सहकार क्षेत्रात कर्मचारी पतसंस्था आणि इतर संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. गेल्या २५ वर्षांपासून ते विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. तसेच, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या सामाजिक, सहकार, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मुंबई हितवर्धक मंडळाने त्यांचा विशेष नागरी सन्मान केला. या कार्यक्रमात माजी प्रशासकीय अधिकारी मोहन गवस यांच्या हस्ते आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, कोकणसादचे संपादक संदीप देसाई, माजी जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी पिकुळे मुंबई हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते (मुंबई महानगरपालिका) सावळाराम उर्फ बबनराव गवस, सचिव प्रमोद गवस, हायस्कुलचे मुख्याध्यापक अशोक आंबूलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators