ग्रुप ग्रामपंचायत दळे इमारतीचे छप्पर कोसळले!
एक वर्षांपूर्वीच दुरुस्तीचा ठराव मंजूर, तरीही प्रशासनाची उदासीनता कायम
समिर शिरवडकर – रत्नागिरी
राजापूर (दळे) – राजापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दळे इमारतीवरील छप्पर २४ एप्रिल रोजी कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामागील मुख्य कारण म्हणजे प्रशासनाचे दुर्लक्ष. विशेष म्हणजे, या इमारतीच्या दुरुस्तीचा ठराव एक वर्षापूर्वीच मंजूर झाला होता, तरीही निधी मिळाला नाही आणि कोणतीही कार्यवाही झाली नाही.
गटातील नऊ सदस्य आणि जवळपास तीन हजार लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीसाठी ठराव पारित होऊनही निधी मिळत नसेल, तर त्यामागे पाठपुराव्याचा अभाव आहे की प्रशासनाचा हलगर्जीपणा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोसळलेली हीच इमारत विशेष ग्रामसभा (२४ एप्रिल) आणि मासिक सभा (२५ एप्रिल) आयोजित करण्यासाठी वापरली जाणार होती. घटनास्थळी कोणतेही संरक्षणात्मक उपाय योजले नव्हते.
ग्रामविकास अधिकारी गोरक्ष शेलार यांनी गटविकास अधिकारी यांना काही महिन्यांपूर्वी पत्र दिल्याचे सांगितले, ज्यात “इमारतीचे नुकसान झाल्यास जबाबदार मी नसेन” असे स्पष्ट नमूद केले होते.
दरम्यान, गटविकास अधिकारी जगताप यांनी दैनिक चालू वार्ताशी बोलताना “तात्पुरत्या दुरुस्तीची कार्यवाही तात्काळ केली जाईल” असे आश्वासन दिले.
—
#ग्रामपंचायतदळे #राजापूर #इमारतकोसळली #प्रशासनदुर्लक्ष #ग्रामविकास #RatnagiriNews #ग्रामसभा #स्थनिकसमस्या















