वाहतूक नियंत्रण शाखा, विरारमध्ये माहिती अधिकार कायद्याचे धक्कादायक उल्लंघन; माहिती अधिकार कार्यकर्ते अनंत पाटील यांची प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांविरोधात ठाम तक्रार
विरार, २७ एप्रिल २०२५:
माहिती अधिकार कायद्याचा उघडपणे उल्लंघन केल्याचा गंभीर प्रकार वाहतूक नियंत्रण शाखा, विरार येथे घडला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनंत पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार, माहिती अधिकार कायद्याच्या कलम ७(६) च्या स्पष्ट तरतुदीचे उल्लंघन करत प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी विनामूल्य माहिती देण्याचे आदेश न देता बेकायदेशीर व चुकीचा पत्रव्यवहार केला.
अनंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी वाहतूक नियंत्रण शाखेकडे माहिती मागवली होती. विहित कालावधीत माहिती मिळाली नाही म्हणून त्यांनी प्रथम अपील दाखल केले. परंतु अपील सुनावणीत कायद्याचे उल्लंघन करून अपिलीय अधिकाऱ्यांनी जन माहिती अधिकाऱ्याला पाठीशी घातले आणि माहिती न देण्यासाठी संगनमताने प्रयत्न केला. त्यामुळे अनंत पाटील यांना केवळ माहितीपासून वंचित ठेवण्यात आले नाही, तर त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासही देण्यात आला, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकाराच्या निषेधार्थ अनंत पाटील यांनी प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांचा चुकीचा पत्रव्यवहार तात्काळ रद्द करण्याची मागणी केली असून, वाहतूक नियंत्रण शाखा, विरार येथील संबंधित जन माहिती अधिकाऱ्यांना मागितलेली सर्व माहिती विनामूल्य व तात्काळ देण्याचे आदेश देण्यात यावेत, असे ठामपणे सांगितले आहे. तसेच प्रथम अपील सुनावणीत मांडलेल्या मुद्यांनुसार राज्य माहिती आयोग व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दोषी संबंधित जन माहिती अधिकारी यांचेवर कार्यवाहीसाठी शिफारस करण्यात यावी अशीही त्यांची मागणी आहे.
या प्रकरणामुळे वाहतूक विभागातील अपारदर्शक कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असून, नागरिकांमध्ये व माहिती अधिकार कार्यकर्त्यांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे. माहिती अधिकार कायद्याचे रक्षण व्हावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरांमधून होत आहे.