“काश्मीर जळू नये, दहशतवाद्यांना करारा प्रतिउत्तर दिलं जाईल!” — ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचा निर्धार
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधानांचा कठोर इशारा; पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आज (२७ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधताना हल्ल्याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.
मोदी म्हणाले, “पहलगाममधील हल्ला प्रत्येक भारतीयाच्या मनाला वेदना देणारा आहे. दहशतवादी आणि त्यांच्या आकांना काश्मीर जळत राहावं असं वाटतं; मात्र देशाची एकता आणि १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती हे दहशतवाद्यांवर मोठं उत्तर आहे.”
हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबांबद्दल शोक व्यक्त करताना मोदींनी स्पष्टपणे सांगितले की, “पीडित कुटुंबांना न्याय नक्की मिळेल. दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल.”
काश्मीरमध्ये स्थिरता, विकास आणि रोजगाराच्या संधी वाढत असताना झालेला हा हल्ला दहशतवाद्यांच्या हताशपणाचं प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, “भारताच्या एकतेच्या निर्धारासमोर दहशतवाद टिकू शकणार नाही,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत जगभरातून मिळालेल्या सहानुभूतीच्या संदेशांचा उल्लेख केला. “जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध करत मृतांच्या कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला आहे,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’मधून पुन्हा एकदा संपूर्ण देश एकत्र उभा असल्याचा निर्धार दिसून आला आहे.
—
हॅशटॅग्स :
#PahalgamAttack #ModiMannKiBaat #TerrorismInKashmir #NarendraModi #KashmirTerrorAttack #IndiaAgainstTerrorism #JusticeForVictims