????️ पावसाची संततधार; पारगाव सुद्रिकमध्ये थंडीची चाहूल, शेतकरी अडचणीत
चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत; शेतकाम ठप्प, मजुरांवर उपासमारीची वेळ
पारगाव सुद्रिक, वार्ताहर –
पारगाव सुद्रिक परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधार पावसाचा जोर कायम असून संपूर्ण गावात थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांची मोठी तारांबळ उडाली आहे. शेतीतील कामे पूर्णपणे ठप्प झाली असून नांगरणीसह मशागतीची कामे रखडली आहेत.
गेल्या आठवड्यापासून सूर्यदर्शन झालेले नाही. पावसामुळे जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण झाली आहे. शेतात नेऊन देखील जनावरांना योग्य प्रकारे चारा देता येत नाही. परिणामी काही जनावरे उपाशी असल्याच्या घटना समोर येत आहेत.
परदेशातून आलेल्या कामगारांची संख्याही वाढली असून जागा असतानाही मजुरी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. आजही रात्रंदिवस पावसाचा जोर कायम आहे.
द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात सध्या द्राक्ष हंगाम संपलेला आहे. आता मशागतीची तयारी सुरू होण्याची वेळ असताना पावसामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. मात्र, पावसामुळे सध्या पाणी टंचाई मिटली असून कुकडीचे पाणी शेतात पोहोचल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
या भागात द्राक्षे, लिंबू, पेरू ही प्रमुख हंगामी पिके घेतली जातात. महाराष्ट्रातील श्रीगोंदा तालुक्यातील हे गाव व्यापाऱ्यांच्या वर्दळीमुळे द्राक्ष व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. पाऊस लवकर उघडल्यास मशागत सुरू करता येईल, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
—
#पावसाचीसंततधार #पारगावसुद्रिक #शेतकरीअडचणीत #मजुरांचीतारांबळ #द्राक्षपिके #श्रीगोंदा #कुकडीपाणी #RatnagiriVartahar
बातमी नंदकुमार बागडेपाटील
???? फोटो