???? “परत बोललात तर उलट्या करायला लावेन!” – नारायण राणेंचा मनसे नेते प्रकाश महाजनांवर संताप
राज ठाकरेंचाही उल्लेख; नितेश राणेंच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्टद्वारे महाजनांना फटकारले
रत्नागिरी | रत्नागिरी वार्ताहर
भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या टीकेवर चांगलेच भडकले असून, त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे थेट “उलट्या करायला लावेन” असा जाहीर इशारा दिला आहे. नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर प्रकाश महाजन यांनी टीका केली होती. त्यावरून राणेंनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत मनसे नेत्यानाच लायकीची जाणीव करून दिली.
प्रकाश महाजन यांनी एका मुलाखतीत नितेश राणे यांना “जीभ आवरा” असा सल्ला दिला होता. यावर नारायण राणेंनी “महाजन कोण आहेत?”, “राजकारणात काय योगदान दिलं?”, असे प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर हल्लाबोल केला.
राज ठाकरे आणि आपले संबंध बोलण्याच्या पलीकडचे आहेत, असा उल्लेख करत राणेंनी महाजनांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
राणेंनी म्हटलं, “नितेशने आपली प्रतिमा, बुद्धिमत्ता आणि जनतेतील विश्वास सिद्ध केले आहेत. तुम्ही किती वेळा निवडून आला आहात?”
“तोंड आणि जीभ वापरण्याआधी लायकी पाहावी,” असा टोला लगावत, महाजनांनी जर परत वक्तव्य केलं, तर “उलट्या करायला लावेन”, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.
राजकीय वर्तुळात या पोस्टमुळे खळबळ उडाली असून, मनसेकडून यावर काय उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.