???? जिल्ह्यातील एकाच गावावर १४ कोटींचा पर्यटन निधी!
कंत्राटदाराच्या भल्यासाठी कामे – डॉ. विनय नातू यांचा आरोप
गुहागर, ता. १२:
“पाच ते सहा गावांचा एक गट आणि ३ ते ५ कोटी इतक्या मर्यादेतच पर्यटन विकासासाठी कामांना मंजुरी द्यायची” – अशा स्पष्ट शासन निर्णयाचा भंग करत, दापोली तालुक्यातील एका एकमेव गावासाठी तब्बल १४ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले की, या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी अनेक कामे टिकाऊ नाहीत, पर्यटनाच्या दृष्टीने उपयोगी नाहीत, किंवा प्रत्यक्षात करणे अशक्य आहे. त्यामुळे ह्या योजना केवळ ठराविक कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आखल्या गेल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला.
शासन निर्णय डावलून निधी मंजूर?
डॉ. नातू यांच्या मते, ग्रामविकास विभागाच्या ठराविक निकषांना धाब्यावर बसवूनच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आणि चुकीची आहे, त्यामुळे कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेतील निधीचा गैरवापर होत आहे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
या पार्श्वभूमीवर डॉ. नातू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे निवेदन देऊन या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, कोकणातील पर्यटन विकास निधी स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी वापरण्यात यावा, असेही त्यांनी सुचवले आहे.