यशवंत चांदजी महिला गोविंदा पथकाचा दशकपूर्ती सराव शुभारंभ उत्साहात संपन्न!
भांडुप (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंत चांदजी स्पोर्ट्स क्लबच्या महिला गोविंदा पथकाने आपल्या गौरवशाली दशकपूर्ती वर्षात प्रवेश करत गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, एक खास सराव शुभारंभ कार्यक्रम भांडुप येथील यशवंत चांदजी सावंत विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात मोठ्या उत्साहात साजरा केला.
परिसर रांगोळ्यांनी, पारंपरिक देखाव्यांनी आणि सजावटीने नटलेला होता. सनईच्या मंगलध्वनीत, कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपज्योतीने सर्व गोपिकांचे औक्षण करून त्यांचे मैदानात आत्मीय स्वागत
करण्यात आले.
या विशेष सोहळ्याला नयना श्याम तावडे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. श्याम तावडे, मा. नगरसेविका जागृतीताई पाटील, निकिता घाडीगावकर, राहुल जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली.
कार्यक्रमात छत्रपती महाराणी ताराबाई भोसले प्रतिष्ठानच्या लहान मुलींनी सादर केलेले लाठी-काठीचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरले. या मुलींचे मोफत प्रशिक्षण हेच मैदान देत आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली.
यानंतर मोठ्या गोपिकांनी लहान गोपिकांना खांद्यावर घेऊन घातलेली प्रदक्षिणा आणि नंतर आत्मविश्वासाने दिलेली ४ थरांची सलामी आणि ५ थरांची सुसंघटित रचना, हे दृश्य प्रेक्षकांसाठी रोमहर्षक ठरले. टाळ्यांचा कडकडाट आणि “रणरागिणीं”साठी उस्फूर्त जल्लोष वातावरणात भर टाकत होता.
कार्यक्रमात सर्व मान्यवर व गोपिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. जागृतीताई पाटील यांनी आपल्या मनोगतातून “ही कौशल्ये प्रत्येक स्त्रीने आत्मसात केली पाहिजेत – ही काळाची गरज आहे” असे स्पष्टपणे सांगितले आणि दशकपूर्तीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रा. आरती कोकाटे-केसरकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आत्मीयतेने व ओघवत्या शैलीत करत संपूर्ण कार्यक्रमात रंग भरले.
कार्यक्रमाची सांगता आनंद, गर्व आणि प्रेरणा अशा वातावरणात झाली. यशवंत चांदजी महिला गोविंदा पथकाच्या या दशकपूर्ती सराव शुभारंभाने केवळ कसरती नव्हे, तर नारीशक्तीचा भव्य जागर घडवून आणला!