‘कोsहं सोहम्’ पुस्तक प्रकाशन सोहळा; संगीत रंगभूमीच्या शिलेदारास कृतज्ञ श्रद्धांजली
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी संगीत रंगभूमीच्या परंपरेत लक्षणीय स्थान लाभलेले ज्येष्ठ गायक नट अरविंद पिळगांवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या आत्मकथनात्मक लेखनाचा संपादित संग्रह ‘कोsहं सोहम्’ रसिकांच्या हाती येणार आहे. त्यांच्या समृद्ध कारकिर्दीत आलेल्या अनुभवांचे सजीव लेखन बालगंधर्वांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, १५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७:१५ वाजता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी (मिनी थिएटर) येथे संपन्न होणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते होईल. यावेळी ज्येष्ठ गायक अजितकुमार कडकडे आणि ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री व पद्मश्री पुरस्कारप्राप्त नयना आपटे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अमेय रानडे करणार असून, संपूर्ण सोहळा रसिकांसाठी एक सांस्कृतिक पर्व ठरेल.
हे पुस्तक ‘स्वामी पब्लिकेशन्स’ यांच्यातर्फे प्रकाशित होत असून, तपास्या नेवे यांनी त्याचे संपादन केले आहे. प्रकाशन सोहळ्याचे आयोजन प्रकाशक आकाश भडसावळे आणि कै. अरविंदजींचे पुतणे दिनेश पिळगांवकर यांनी संयुक्तपणे केले आहे.
प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून, रसिकांनी सायंकाळी ६:४५ वाजेपर्यंत आसनस्थ व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. संगीत नाट्य परंपरेचे साक्षीदार असलेल्या अरविंद पिळगांवकर यांच्या स्मृतींना आणि कलायात्रेला अर्पण केलेली ही प्रकाशन भेट, म्हणजेच एक कृतज्ञ आणि कलाभिमुख श्रद्धांजली ठरणार आहे.