‘चला हवा येऊ द्या’ मध्ये कोकणचा ‘बाज’!
संगमेश्वरी कवी सचिन काळे यांची ‘झी मराठी’वरील लोकप्रिय कार्यक्रमात निवड; कोकणभर आनंदाची लाट
नवी मुंबई (मंगेश जाधव वेळबंकर): रत्नागिरी जिल्ह्यातील चवे गावचे सुपुत्र, एक हरहुन्नरी कलाकार, संगमेश्वरी बोलीभाषेतील कवी आणि ‘कोकणचा साज – संगमेश्वरी बाज’ या लोकप्रिय लोकनाट्य समूहाचे सचिव सचिन काळे यांची झी मराठीवरील प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या सीझनमध्ये निवड झाल्याची अत्यंत आनंददायक बातमी समोर आली आहे. यामुळे संपूर्ण कोकणात उत्साहाचे वातावरण आहे.
सचिन काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून संगमेश्वरी बोलीभाषा, कोकणातील लोककला आणि हास्यनाट्य या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी ‘कोकणचा साज – संगमेश्वरी बाज’ या नाट्यप्रयोगातून कोकणातील प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसवलं आहे, त्याचबरोबर संगमेश्वरी बोलीभाषेला एक मोठा मंच मिळवून दिला आहे.
आता ते ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात आपला विनोदी अभिनय सादर करताना दिसणार आहेत. हसवणूक आणि समाजिक संदेश यांचा सुंदर मेळ साधणाऱ्या त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी सचिन काळे यांनी रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या मराठी चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच, त्यांनी झी मराठीवरील एका स्कीटमध्ये अभिनेता ओंकार भोजने यांच्यासोबतही दमदार अभिनय केला होता.
या यशाबद्दल बोलताना सचिन काळे म्हणाले, “कोकणातील बोलीभाषा, विनोद आणि संस्कृती यांना एका मोठ्या व्यासपीठावर पोहोचवणे, हा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. ‘चला हवा येऊ द्या’ सारखा हा प्रतिष्ठित मंच मिळणे, हे माझ्यासाठी खूप सन्मानास्पद आहे. हे यश केवळ माझे नसून, कोकणातील सर्व लोककलेच्या कार्यकर्त्यांचे आहे.”
त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण कोकणात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, प्रेक्षकांनीही शनिवार आणि रविवार, २६ जुलैपासून हा कार्यक्रम आवर्जून पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#SachinKale #ChalaHawaYeuDya #Kokan #ZeeMarathi #Sangameshwar #MarathiComedy #Ratnagiri #KonkanchaSaaj #मनोरंजन #कोकणचावाज #NewSeason #MarathiArtist #लोककला #Entertai
nmentNews