१० ऑगस्ट रोजी भोगवे बीचवर रंगणार गळ मासेमारी स्पर्धा..!प्रथम बक्षीस १५ हजार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य दिव्य स्पर्धा
सर्वात मोठ्या माशाच्या वजनावरुन ठरणार प्रथम क्रमांक विजेता
आबलोली (संदेश कदम)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात स्वच्छ,सुंदर आणि शांत समुद्र म्हणून नावलौकिक मिळवलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे बीचवर भव्य दिव्य अशी गळ(गरी)मासेमारी स्पर्धा रंगणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत या बाबतचे नियोजन असून प्रथम क्रमांक विजेत्याला सर्वात मोठ्या माशाच्या वजनावरुन १५०००/- रुपये पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
भोगवे कोलवेल ग्रामस्थांच्या वतीने सलग ५ व्या वर्षी हि स्पर्धा घेण्यात येत आहे. गळ मासेमारी स्पर्धेसाठी फी १०००/- रुपये ठेवण्यात आली असून हि स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ५:०० हि स्पर्धा उत्साहात पार पडणार असून नाव नोंदणीसाठी दिनांक ३१ जुलै २०२५ हि अंतीम तारीख आहे. प्रथम नोंदणी केलेल्या २०० स्पर्धकांनाच या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल नाव नोंदणीसाठी स्पर्धकांनी ८४४६२५२१८२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला एकच तंगूस (साव) वापरण्याची परवानगी असून एका तंगुसाला जास्त गळ (ग-या) जोडता येणार आहेत. लांबारी लठारी (काठी) वापरुन तसेच आधुनिक रिळ असलेले गळ (ग-या) वापरुन किनाऱ्यावर अथवा खडकावर ऊभे राहून गळाने मासे पकडण्याची परवानगी आहे.कोणतेही जाळे अथवा नाव (बोट)वापरल्यास स्पर्धक बाद ठरवण्यात येईल.प्रत्येक व्यक्तीच्या गळाला लागलेला मासा त्याने एकट्यानेच खेचून जमीनीवर आणायचा आहे.दुस-या व्यक्तीची मदत घेणारा स्पर्धेक बाद ठरविण्यात येईल तसेच स्पर्धकाला समुद्र किनारी ३ फुट खोली पलीकडे जाण्याची परवानगी नाही. मासे पकडताना मद्यपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शिस्त आणि सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य असून स्पर्धेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
स्पर्धेतील विजेता ठरविताना एकुण किती मासे पकडले यावरुनच ठरविला जाणार असून जास्त वजनाचा मासा पकडणा-याला प्रथम क्रमांकाचे १५ हजार रुपये पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी तसेच व्दितीय क्रमांकास १० हजार रुपये पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी, आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तरी स्पर्धकांनी नाव नोंदणी व अधिक माहिती साठी सुरज सामंत मो. नं. ८४४६२५२१८२,शेखर सामंत मो. नं. ९४२१२६१८१९ यांचेशी मोबाईलवर संपर्क साधावा असे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे