आ. हेमंत ओगले यांना दिसेल तिथे काळे झेंडे दाखवणार – भीमराज बागुल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आ. हेमंत ओगले यांना दिसेल तिथे काळे झेंडे दाखवणार – भीमराज बागुल

 

श्रीरामपूर (नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधी) – श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील टिळकनगर इंडस्ट्रीज या कारखान्याच्या संदर्भात विधानसभेमध्ये आमदार हेमंत ओगले यांनी केलेल्या कथित चुकीच्या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटा) चे विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल यांनी आमदार ओगले यांना जाहीर इशारा दिला आहे की, “हेमंत ओगले यांना दिसेल तिथे काळे झेंडे दाखवण्यात येतील.”

 

भीमराज बागुल यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीरामपूर मतदारसंघातील आरक्षित जागेवर निवडून आलेले काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी नुकतेच राज्य विधानसभेत झालेल्या चर्चासत्रात टिळकनगर इंडस्ट्रीजविषयी अत्यंत गंभीर आणि दिशाभूल करणारे वक्तव्य केले. त्यात त्यांनी असे म्हटले की, “टिळकनगर इंडस्ट्रीजमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दूषित पाणी मिळते, त्याचा शेतीवर विपरित परिणाम होतो, ते पाणी पिण्यायोग्य नाही आणि त्यामुळे जमिनीचा दर्जाही खालावला आहे. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना बागुल यांनी म्हटले की, “हे वक्तव्य केवळ चुकीचेच नाही, तर टिळकनगर इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या हजार कामगारांच्या जीवनावर घाला घालणारे आहे. या कारखान्यातील कामगारांमध्ये या विधानामुळे तीव्र संताप निर्माण झाला असून अनेकांनी आमदार ओगले यांना जाब विचारण्याचा निर्धार केला आहे.

 

बागुल पुढे म्हणाले, “टिळकनगर इंडस्ट्रीज ही गेली अनेक वर्षे श्रीरामपूर परिसरातील केवळ आर्थिक नाही तर सामाजिक स्थैर्याचा केंद्रबिंदू ठरली आहे. या कारखान्यामुळे हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाह चालतो. हा कारखाना केवळ उद्योग नाही तर स्थानिकांसाठी रोजगाराचा मुख्य स्रोत आहे. आमदार ओगले यांनी या उद्योगाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून कामगारांच्या जीवनावर संकट निर्माण केले आहे. रिपब्लिकन पार्टीच्या मते, कारखान्याकडून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो. पिण्याच्या पाण्यासाठीही दररोज टँकरने स्वच्छ पाणी पोहोचवले जाते. त्या परिसरातील शेतजमिनीत चांगली शेतीही होते आणि तीथील शेतकरी समाधानी आहेत. “या भागात गेल्या तीन पिढ्यांपासून लोकांचा उदरनिर्वाह या कारखान्यावर आधारित आहे. आजवर कोणीही असा मुद्दा उपस्थित केला नाही. मग आमदार ओगले यांनीच अचानक हा विषय का उपस्थित केला?” असा सवालही बागुल यांनी केला आहे.

 

बागुल यांनी आमदार ओगले यांच्यावर टीका करत पुढे म्हटले की, “जेव्हा रोजगार निर्मिती करणे अपेक्षित आहे, त्यावेळी सध्याचे रोजगार बंद करण्याचा प्रयत्न होतो आहे. जर उद्या टिळकनगर इंडस्ट्रीज बंद पडली, तर त्या 1हजार कामगारांच्या पोटापाण्याची जबाबदारी ओगले घेणार आहेत का? का त्यांनी हा मुद्दा उचलून धरला यामागे राजकीय हेतू आहे का?”

 

या संपूर्ण प्रकरणावरून येणाऱ्या काळात श्रीरामपूरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता बळावत आहे. बागुल यांनी सूचित केले की, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गोरगरीब जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. “आमदार ओगले यांनी जनतेला रोजगारापासून वंचित करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र जनतेसमोर आले आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी असून, त्याचा फटका काँग्रेसला भविष्यात भोगावा लागेल,” असेही बागुल यांनी स्पष्ट केले. शेवटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घोषित केले आहे की आमदार हेमंत ओगले जिथे जिथे जनतेच्या समोर येतील, तिथे तिथे त्यांना काळे झेंडे दाखवले जातील आणि त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल.

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...