वाढवण बंदरासाठी स्थानिक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक — मंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शन
वेंगुर्ला, मालवण, देवगड आयटीआयमध्ये सागरी अभ्यासक्रम राबवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – कोकणातील महत्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पासाठी आवश्यक कुशल कर्मचारी वर्ग स्थानिक पातळीवरच तयार करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली. या बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या बैठकीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था विभागाचे प्रमुख अनिल मोहेर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच जिल्ह्यातील सर्व आयटीआयचे प्राचार्य सहभागी झाले होते.
वाढवण बंदर प्रकल्पामुळे संपूर्ण कोकण परिसरात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे सागरी किनारपट्टीवरील वेंगुर्ला, मालवण व देवगड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सागरी क्षेत्राशी संबंधित विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावेत, असे स्पष्ट निर्देश या बैठकीत देण्यात आले.
या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षक, मनुष्यबळ व इमारतींची सध्याची स्थिती यावर आधारित अहवाल सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली. स्थानिक तरुणांना उद्योगक्षम बनवून त्यांना वाढवण बंदराशी जोडण्याचा सकारात्मक प्रयत्न सरकारतर्फे सुरु असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले.
—
#वाढवण_बंदर #सिंधुदुर्ग #नितेश_राणे #औद्योगिक_प्रशिक्षण_संस्था #रोजगारसंधी #कोंकणविकास
📸 फोटो