जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय परिसंवाद – ‘स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत आधार प्रणाली तयार करा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त राज्यस्तरीय परिसंवाद – ‘स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत आधार प्रणाली तयार करा’

३०० विद्यार्थी, स्वयंसेवक व तज्ज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून श्रीमती मंजुलाबेन गुणवंतराय शाह पदव्युत्तर अभ्यास विभाग (एमएससी. क्लिनिकल न्यूट्रिशन आणि आहारशास्त्र), डॉ. बी. एम. कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त) आणि नुट्रीशन सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, रुसा प्रायोजित राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यंदाचा परिसंवाद ‘स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत आधार प्रणाली तयार करा’ या विषयावर केंद्रित होता. स्तनपान ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया नसून बालआरोग्याचा मजबूत पाया घालणारी, माता–बाल नात्यातील विश्वास आणि प्रेम वृद्धिंगत करणारी जीवनशैली आहे, यावर परिसंवादाचा विशेष भर होता.

पहिल्या सत्रात डॉ. अमृता देसाई, स्तनपान व्यवस्थापन सल्लागार, एनआयसीयू विभाग, केईएम हॉस्पिटल, पुणे यांनी ‘स्तनपान व्यवस्थापन: एक समाधानकारक करिअर’ या विषयावर आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या मान्यताप्राप्त कोर्सेसची माहिती दिली, तसेच स्तनपान व्यवस्थापन सल्लागार म्हणून लागणाऱ्या कौशल्ये आणि गुणवत्तांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या अनुभवातून त्यांनी सांगितले की, “जन्मानंतरच्या पहिल्या तासात बाळाला आईचे दूध पाजण्याची सवय लावल्यास त्याच्या प्रतिकारशक्तीवर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतात.”

दुसऱ्या सत्रात श्रीमती मालती डहाणूकर ट्रस्ट (एसएमडीटी), नाशिक यांच्या समूहाने स्तनपान करण्याच्या प्रभावी पद्धतींचे प्रत्यक्षिक सादर केले. जुळ्या मुलांना स्तनपान देण्याच्या पद्धती, तान्ह्या मुलाला पाजल्यानंतर ढेकर काढण्याचे योग्य मार्ग तसेच गरोदर व स्तनपान देणाऱ्या मातांसाठी आणि मुलांसाठी संतुलित आहाराबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.

या परिसंवादात मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि अमरावती येथून सुमारे ३०० विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही माध्यमांतून सहभागी झाले. उपस्थितांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, अशा उपक्रमांनी मातृत्व आणि बालआरोग्य क्षेत्रात जागरूकता वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त

केले.

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...