शृंगारतळी पेढा विषबाधा: ११ महिला रुग्णालयात, FDA चा बेकरीवर छापा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

शृंगारतळी पेढा विषबाधा: ११ महिला रुग्णालयात, FDA चा बेकरीवर छापा

* वेदांत ज्वेलरीच्या ११ महिलांना पेढ्यातून विषबाधा, शृंगारतळी बेकरी चर्चेत

* अन्न विषबाधा प्रकरण: शृंगारतळीतील अय्यंगार बेकरीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पेढ्यातून विषबाधा – ११ महिला रुग्णालयात, अन्न व औषध प्रशासनाचा शृंगारतळीत छापा

आबलोली (संदेश कदम)
शृंगारतळी येथील अय्यंगार बेकरीतून आणलेल्या पेढ्यांमुळे वेदांत ज्वेलरीमध्ये काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा होऊन त्यांना तातडीने शृंगारतळीतील प्रोलाईट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान दिवसभराच्या उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याची खात्री करून रात्री उशिरा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या पाठीमागील इमारतीत वेदांत ज्वेलरीचे मालक बळीराम साळवी (रा. मळण) यांनी महिलांना रोजगार मिळावा म्हणून मुंबईहून ज्वेलरीचे मटेरियल आणून काम सुरू केले होते. श्रावण महिन्यातील सोमवारच्या निमित्ताने एका महिलेने सकाळी सुमारास अय्यंगार बेकरीतून पेढे आणले आणि सर्व सहकाऱ्यांना अर्धा-अर्धा पेढा दिला. काही वेळातच सर्वांना चक्कर, मळमळ आणि उलटीसारखी लक्षणे जाणवू लागली.

यामध्ये स्वप्नाली पवार (२७), प्रतीक्षा मोहिते (२८), पूजा मोहिते (२३), वृषाली पवार (२६), विदिशा कदम (२३), सोनाली नाईक (२१), मधुरा घाणेकर (२३), निकिता गमरे (२५), प्रिया मोहिते (४०), संजना गिरी (३०) आणि मानसी शिगवण (२८) यांचा समावेश आहे. या सर्व महिला तळवली, मळण, पालपेणे परिसरातील रहिवासी आहेत.

घटनास्थळी उपस्थित असलेले डॉक्टर राहुल चव्हाण यांनी सर्व महिलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. दरम्यान, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. वाडकर यांनी तातडीने भेट दिली, तर गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी टीमसह पंचनामा केला.

शृंगारतळीत बेकऱ्यांची संख्या मोठी असली तरी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रभावी नियंत्रण नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष का करतो, असा सवाल जनतेतून उपस्थित करण्यात आला आहे.

घटनेनंतर रत्नागिरी येथून अन्न व औषध प्रशासनाची दोन जणांची टीम तपासणीसाठी दाखल झाली. तसेच, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नासिमशेठ मालाणी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेऊन आवश्यक सहकार्याचे आश्वासन दिले.

स्थानिकांच्या मते, अशा घटना टाळण्यासाठी बेकरी व्यावसायिकांवर कडक कारवाई करून पोलिस आणि प्रशासनाने प्रभावी वचक बसवणे अत्यावश्यक आहे. अन्यथा निष्काळजीपणामुळे जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना मोकळीक मिळत राहील.

 

 

हॅशटॅग्स (Hashtags):

* #शृंगारतळी* #अन्न_विषबाधा* #FoodPoisoning * #पेढा

* #Shringartali * #FoodSafety* #AyyanagarBakery* #FDA_Raid* #रत्नागिरी_न्यूज* #RatnagiriNew * #MaharashtraNews

* #MarathiNews* #वेदांत_ज्वेलरी

* #HealthAlert* #FoodContamination

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...