🌸 कोकणकन्या वर्षा चव्हाण – पत्रकारितेतून समाजसेवेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास 🚩
🚩 कोकणकन्या वर्षा चव्हाण यांना “सन्मानमुर्ती” पुरस्कार
पत्रकारितेतून सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, दादरमध्ये बालपणीच्या शहरातच सन्मान
बदलापूर (प्रतिनिधी) – समाजासाठी काहीतरी करायचे ध्येय मनात बाळगून, पत्रकारितेपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या वर्षा विनायक चव्हाण यांचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. महिलांसाठी सक्षमीकरणाचे उपक्रम, आरोग्य शिबिरे, आंदोलन आणि जागरूकता मोहिमा राबवून त्यांनी बदलापूर शहरासह कोकणातही आपली छाप सोडली आहे.
दादर येथे झालेल्या अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिन सोहळ्यात, त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत “सन्मानमुर्ती” या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. संस्थापिका अध्यक्षा सौ. प्रज्ञा प्रफुल्ल पितळे यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. विशेष म्हणजे ज्या शहरात त्यांचे बालपण गेले, त्या दादरमध्येच हा मानाचा सन्मान मिळाल्याने वर्षा चव्हाण यांचा आनंद द्विगुणित झाला.
२०१९ मध्ये नोकरीसोबत सामाजिक आवड म्हणून पत्रकारितेची सुरुवात करत स्फुर्ती फाऊंडेशनमध्ये सक्रिय झालेल्या वर्षा चव्हाण यांनी २०२२ मध्ये शिवसेना महिला आघाडी उपशाखा पदावरून राजकारणात प्रवेश केला. २०२३ मध्ये उपशहर संघटीका, आणि २०२५ मध्ये शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख (बदलापूर पूर्व) या पदावर कार्य करत त्यांनी समाजातील महिलांच्या आवाजाला बळ दिले.
याशिवाय त्या कोकण युवा सेवा संस्था, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ह्युमन राईट्स (ठाणे जिल्हा उपाध्यक्ष) आणि माहिती अधिकार पोलिस मित्र सेना यांसारख्या संघटनांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून जननायिका पुरस्कार २०२४ आणि भारत निर्माण योगदान अवॉर्ड २०२५ यांसह अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत.
वर्षा चव्हाण म्हणतात, “सन्मान हा केवळ गौरव नसून जबाबदारीही असते. समाजासाठी अजून खूप काही करायचे आहे. विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि कोकणातील विकासासाठी मी नेहमीच पुढे राहीन.”
समाजासाठी काहीतरी वेगळं आणि परिणामकारक करण्याची जिद्द, महिलांसाठी सक्षमीकरणाचे उपक्रम राबविण्याची तळमळ आणि कोकणाशी असलेली घट्ट नाळ… या सर्वांचा संगम म्हणजे कोकणकन्या वर्षा विनायक चव्हाण. पत्रकारितेपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रापर्यंतचा त्यांचा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
वार्तांकन ~ सुजित सुर्वे, रत्नागिरी
🌟 रत्नागिरी वार्ताहर कडून कोकणकन्या वर्षा चव्हाण यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟
—
#VarshaChavan #KonkanKanya #Badlapur #SocialWork #ShivsenaMahilaAghadi #SammanaMurti #Journalism #RatnagiriVartahar