Dream11 कडून खेळाडूंना आवाहन: आपापले पैसे काढून घ्या! संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक मंजूर
नवी दिल्ली: संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ मंजूर झाल्यामुळे, ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना मोठा झटका बसला आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळताच, देशभरात रिअल-मनी ऑनलाइन गेम्सवर (Real-money online games) कडक निर्बंध येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, लोकप्रिय ऑनलाइन गेमिंग ॲप *Dream11* ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ॲपमधील ‘पे टू प्ले’ (Pay to Play) हा पर्याय तात्काळ रद्द केला आहे आणि त्यांच्या खेळाडूंना खात्यातील सर्व पैसे काढून घेण्यास सांगितले आहे.
*पैसे सुरक्षित, कंपनीचा खेळाडूंना दिलासा*
गेमिंग विधेयक मंजूर झाल्यानंतर, Dream11 ने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की, ‘आमच्या ॲपचा वापर करणाऱ्या सर्व खेळाडूंनी त्यांच्या खात्यातील पैसे काढून घ्यावेत.’ त्याचबरोबर, ‘तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असून ते कुठेही जाणार नाहीत. तुम्ही ते कधीही तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता,’ असा विश्वासही कंपनीने दिला आहे.
*विधेयकाचा मुख्य उद्देश काय?*
संसदेने मंजूर केलेल्या या विधेयकाचा मुख्य उद्देश ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली चालणाऱ्या जुगार आणि सट्टेबाजीवर नियंत्रण आणणे हा आहे. गेल्या काही वर्षांत, ऑनलाइन गेमिंगमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तसेच काही ठिकाणी आत्महत्या झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे, केंद्र सरकारने यावर कठोर पाऊले उचलण्याचे ठरवले आहे. जरी Dream11 सारखे काही ॲप्स ‘स्किल गेम्स’ (skill games) असल्याचा दावा करत असले, तरी सरकारच्या नव्या नियमांनुसार, पैशांचा समावेश असलेल्या कोणत्याही गेमिंगवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
या विधेयकामुळे Dream11, रमी आणि पोकर यांसारख्या रिअल-मनी गेम्सच्या भवितव्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या Dream11 च्या या निर्णयामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे.