💥 सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका!
🟣 डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले; ‘आनंदाचा शिधा’ही बंद
मुंबई :
गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस बाकी असताना सणासुदीच्या खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. मात्र, आनंदाच्या या दिवसांत महागाईने चांगलाच भडका उडवला आहे. सणासुदीच्या काळात लागणाऱ्या मैदा, रवा, डाळी, साखर, खाद्यतेल यांच्या दरात तब्बल १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर ताण येऊ लागला आहे.
गोडधोड व पंचपक्वान्नांची रेलचेल असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साहित्याची मागणी वाढली असून त्याचा थेट परिणाम भाववाढीवर झाला आहे. हरभरा, तूर, मसूर डाळींच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. गहू-तांदळाचे भावही वाढू लागले असून घरखर्च आटोक्यात ठेवणे नागरिकांसाठी आव्हान ठरत आहे.
येत्या गौरी-गणपती, नवरात्र व दिवाळीपर्यंत हरभरा व बेसन डाळीला मोठी मागणी राहणार आहे. त्यामुळे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, रेशनमधून मिळणाऱ्या डाळ, रवा, तेल व साखरेच्या ‘आनंदाच्या शिध्या’ने सामान्यांना दिलासा मिळत होता. मात्र, हा शिधा बंद झाल्याने आता नागरिकांना खुले बाजारातूनच वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. महागाईची झळ यंदा थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात जाणवत आहे.
—
🏷️ हॅशटॅग्स :
#महागाई #गणेशोत्सव२०२५ #डाळींचेभाव #साखरदरवाढ #आनंदाशिधा #रत्नागिरीवार्ताहर
📸 फोटो