सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांचे संयुक्त विद्यमाने ‘सागरी मत्स्यालय व्यवस्थापण’ तसेच ‘मत्स्य खाद्य उत्पादन’ या विषयावर व्याख्यान आयोजन
रत्नागिरी -डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव संयुक्त विद्यमाने “सागरी मत्स्यालय व्यवस्थापण” तसेच “मत्स्य खाद्य उत्पादन” या विषयांवर विशेष व्याख्यान दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित केले होते. यावेळी डॉ. सुबिन मॅथ्यूज, मुंबई आणि इंजि. श्री. आदित्य महाले, पनवेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. यावेळी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव चे तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. सुबिन मॅथ्यूज यांनी युकेमधील साउथहॅम्प्टन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि फिजिक्समध्ये पीएच.डी. पदवी घेतली आहे. अभियांत्रिकी कौशल्य आणि सागरी विज्ञानाची आवड एकत्रित करून, त्यांनी सागरी प्रणाली आणि कोरल प्रजनन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून प्रगत मत्स्यालयाच्या डिझाइनमध्ये विशेषतज्ज्ञता मिळवली आहे. ते ‘जि.एस.एम. अॅक्वॉरीयम प्रोडक्ट इंडिया एल.एल.पी. मधील संशोधन पथकाचे नेतृत्व करतात, जे भारतभर मत्स्यालय, टेरेरियम, पॅलुडेरियम आणि मोठ्या प्रमाणात जलीय प्रकल्पांवर काम करतात. त्यांचे काम कोरल प्रसार आणि सागरी परिसंस्थेच्या विकासात शाश्वतता आणि नव-ऊपक्रम यांवर भर देत असते. डॉ. मॅथ्यूज हे मत्स्यपालन आणि सागरी विज्ञानातील व्यावसायिकां ज्ञान आणि प्रेरणा देण्यासाठी शैक्षणिक संस्थांशी सक्रियपणे सहकार्य करतात.
श्री आदित्य महाले हे माणेत-एम.आय.टी. पुणे येथील मरीन इंजिनिअर आहेत. ते अॅक्वॉटीक सिस्टिम आणि मरिन ऑपरेशन्स यामध्ये तज्ञ आहेत. त्यांनी शोभिवंत मासे, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राणी आणि इतर प्रजातींसाठी उच्च दर्जाच्या खाद्य निर्मितीमध्ये विशेषज्ञता विकसित केली आहे. त्यांचे खाद्यांचे फॉर्म्युलेशन शोभिवंत माशांच्या आरोग्य व वाढी करिता मदत करतात.
दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित केलेल्या ‘मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव’ येथे आयोजित केलेल्या व्याख्यान मध्ये डॉ. सुबिन मॅथ्यूज यांनी ‘सागरी मत्स्यालयाचे प्रकार व व्यवस्थापण, सागरी प्रवाळ संवर्धन तसेच आवश्यक प्रकाश योजना’ या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. मॅथ्यूज यांनी सागरी मत्स्यालयाचे प्रकार, त्यांची मांडणी करण्यासाठी लागणारी उपकरणे तसेच त्यांची निगा व काळजी कशी घ्यावी, सागरी प्रवाळ संवर्धन करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. श्री. आदित्य महाले यांनी ” मत्स्य खाद्याचे प्रकार व त्याचे उत्पादन कसे केले जाते” यावर व्याख्यान मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी यांनी प्रमुख अतिथी यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथील डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, डॉ. हरिष धमगये, अभिरक्षक, प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी, श्रीम. व्ही. आर. सदावर्ते, जीवशास्त्रज्ञ तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगावचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव, श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, श्री. सुशील कांबळे, श्रीमती. मयुरी डोंगरे उपस्थित होते.