■ तेवीस हजार सक्रीय सभासद असलेली राजापूर अर्बन बँक घोटाळ्याचा विळख्यात..
■ पुरुषोत्तम खांबल – राजापूर
राजापूर :- राजापूर तालुक्यातील नामवंत, गोरगरिबांच्या व्यवसायाला चालना देणारी, तसेच प्रकाश चव्हाण, इब्राहिम बलबले यांसारख्या दिग्गज संचालक लाभलेल्या मंडळींच्या बँकेत करोडोंचा घोटाळा घडू शकतो यावर विश्वासच बसत नाही. परंतु हे वास्तव आहे. काही दिवसांपूर्वी राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेमध्ये खोटी आणि मोठी कर्ज प्रकरणे झाली असून तो आकडा कोटींच्या घरात आहे. यात दोषी शाखाधिकारी यांना निलंबित केले असून कर्जाची वसुली मात्र सुरू आहे.
राजापूर अर्बन बँक राजापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर कुमार अहिरे यांच्याशी रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र यांच्या प्रतिनिधी ने चर्चा केली असता काही ठळक मुद्दे यात निदर्शनास आले.
◆ शाखाधिकारी यांना पाच लाख रक्कमेची कर्ज मंजूर करण्याचे अधिकार आहेत. त्यांना अशी कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी संचालक मंडळात द्यावयाची गरज नाही. परंतु कर्ज मंजूर अहवाल सुद्धा संचालक मंडळाने का मागवला नाही? मागवला असेल तर त्यात संचालक मंडळाला हा घोटाळा का दिसला नाही?
◆ सन २०२३-२४ चा शाखानिहाय लेखापरीक्षण अहवाल झाला असून तो अहवाल सुद्धा संचालक मंडळासमोर का आला नाही की मागवला नाही?
◆ रत्नागिरी शाखेत सहा हजार सक्रिय सभासद असुन, यात २०२३-२४ या कालावधीत २.८० कोटी रकमेची खोटी कर्ज प्रकरणे असून एकूण ४३ कर्जदार आहेत. त्यापैकी सुमारे ७३ ते ७५ लाख वसुली झाले आहेत. उर्वरित वसुली कधी होणार?
◆ या सर्व घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी प्रमोद जोशी (निवृत्त बँक अधिकारी) दापोली यांची नियुक्ती झाल्याचे समजले. परंतू हे चौकशी अधिकारी कोणाच्याही आणि कोणत्याही दबावाखाली चौकशी करणार का? सामान्य सभासदांच्या ठेवींमधून वितरित केलेली कर्जाची सर्व रक्कम वसूल होणार का? हे आणि असे अनेक प्रश्न निरुत्तरीत आहेत.
संबंधित विषयी तालूका निबंधक (AR) कार्यालय सहकार यांनी काहीही माहिती नसलेचे सांगितले असुन जिल्हा उपनिबंधक (DDR) कार्यालय उत्तरे देत नाही. हे गौडबंगाल काय?
दरम्यान या विषयी सर्व सभासदांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणार का? बँक पुन्हा आपली विश्वासाहर्ता निर्माण करेल का याबाबत सर्वसामान्य सभासदांच्या मनात शंका आहेत.