चिपळूणमध्ये उपोषणस्थळी गोंधळ; पत्रकारावर हल्ला, ॲट्रॉसिटीसह दोन गुन्हे दाखल
📌 बहादूरशेख नाका येथे तणावपूर्ण परिस्थिती; डीवायएसपी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू
🗞️ सविस्तर बातमी
चिपळूण (रत्नागिरी) : शहरातील बहादूरशेख नाका परिसरात उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, या घटनेत पत्रकारावर हल्ला झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दि. २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास चिपळूण नागरी पतसंस्थेच्या कथित गैरकारभाराविरोधात रुपेश सुरेश पवार (रा. खेड) हे उपोषणास बसणार होते. या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी दूरदर्शनचे पत्रकार दीपक दिलीप भागवत व कॅमेरामन रुपेश साळुंखे घटनास्थळी दाखल झाले होते.
यावेळी १० ते १५ जणांच्या जमावाने पत्रकारांना अडवून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांना थपडा व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली तसेच त्यांच्या बॅगमधील आयडी कार्ड व अन्य साहित्य चोरीस गेले.
या प्रकरणी पत्रकार दीपक भागवत यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी १० ते १५ जणांविरोधात गुन्हा रजि. नं. ८२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांसह महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व संस्था (हिंसा प्रतिबंधक) अधिनियम २०१७ अंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेत दुसरी फिर्याद अभिषेक मोहिते यांनी दाखल केली असून, त्यानुसार उपोषणकर्ते रुपेश पवार व रवींद्र पवार यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या तक्रारीतील नेमके आरोप पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.
या संपूर्ण घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांमध्ये वाढता तणाव चिंतेचा विषय ठरत आहे.
पोलीसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची साक्ष, व्हिडिओ चित्रीकरण आणि संबंधित व्यक्तींची विधाने यांच्या आधारे तपास सुरू केला आहे. दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाचे सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे.














