जयगड बंदरातून हापूस, काजू आणि मत्स्य निर्यातीला चालना; मंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
कोकणातील उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शीतसाखळी, निर्यात सुविधा आणि पायाभूत कामांना गती देण्याच्या सूचना
मुंबई : कोकणातील हापूस आंबा, काजू आणि मत्स्य उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरीतील जयगड बंदर महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना निर्यात प्रकल्पाची कामे गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
कोकणातील शेतकरी आणि मत्स्य व्यवसायिकांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळण्यासाठी निर्यात व्यवस्था सक्षम होणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्री राणे यांनी कृषी आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला. यामध्ये शीतसाखळी व्यवस्था, तपासणी प्रक्रिया, वाहतूक साखळी तसेच बंदरांमधील सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा आणि काजू उत्पादन होत असून कोकणातील हापूस आंब्याला जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. तसेच मत्स्यव्यवसाय हा कोकणाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याने या सर्व उत्पादनांची थेट परदेशी बाजारपेठेत निर्यात सुरू करण्यासाठी प्रकल्पाचे काम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निर्यात प्रक्रियेत कोणताही अडथळा राहू नये, असे निर्देश देण्यात आले. तसेच काजू उत्पादक, हापूस आंबा उत्पादक आणि मत्स्य व्यवसायिकांमध्ये या प्रकल्पाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्याही सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.
कोकणातील उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यास स्थानिक शेतकरी, मत्स्य व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होईल तसेच संपूर्ण कोकणाच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
फोटो संग्रहित

















