*नाशिक ते नाणिज 600 किमीचा पायी प्रवास… 1000 भाविकांची पर्यावरणपूरक वारी नाणिजधाम च्या वेशीवर
आबलोली (संदेश कदम)
अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नाणिज धाम येथे 21 तारखेपासून भव्य वारी सोहळा सुरू होत आहे. या सोहळ्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून भक्तगण नाणिजकडे मार्गस्थ झाले आहेत. मात्र यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगतेय ती नाशिकहून आलेल्या एका विशेष दिंडीची ..
नाशिक ते नाणिज हे अंतर तब्बल 600 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. हे अथांग अंतर पार करण्यासाठी या दिंडीतील एक हजार भाविकांनी तब्बल 22 दिवसांचा खडतर पायी प्रवास केला आहे.अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात ही दिंडी आता नाणिज धामच्या वेशीवर म्हणजेच अवघ्या काही अंतरावर येऊन पोहोचली आहे.आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनाची ओढ आणि सोहळ्याचा उत्साह यामुळे भाविकांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे..
या दिंडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे… ही केवळ एक धार्मिक वारी नाही तर ती एक ‘पर्यावरणपूरक वारी’ ठरली आहे. संपूर्ण 22 दिवसांच्या प्रवासात या दिंडीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे वर्ज्य करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर प्रवासादरम्यान ही दिंडी विसाव्यासाठी जिथे जिथे थांबली, तिथे तिथे या हजारो भाविकांनी वृक्षलागवड केली. झाडे लावून केवळ ते थांबले नाहीत, तर वसुंधरेचे ऋण फेडत पर्यावरणाचा एक अत्यंत मोलाचा आणि सकारात्मक संदेश त्यांनी समाजाला दिला आहे..











