खेळाडू ते मुख्य प्रशिक्षक..! “संकेता सावंतची यशस्वी भरारी”, दोन सख्ख्या बहिणी चालवतात तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र

*खेळाडू ते मुख्य प्रशिक्षक..! “संकेता सावंतची यशस्वी भरारी”, दोन सख्ख्या बहिणी चालवतात तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र

​आबलोली (संदेश कदम)

प्रशिक्षण वर्गातील साध्या लादीवर कसून सराव करणाऱ्या बालवयापासून ते थेट व्यासपीठावर पंच म्हणून गौरव स्वीकारण्यापर्यंत संकेता संदेश सावंत हिने तायक्वांदो या मार्शल आर्ट प्रकारात स्वतःचा एक स्वतंत्र ठसा उमटवला आहे. इयत्ता चौथीत असताना या क्रीडा प्रकारात पाऊल ठेवणाऱ्या एका सामान्य मुलीने 18 वर्षांच्या अखंड साधनेतून स्वतःला मुख्य प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंच म्हणून सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, रत्नागिरी शहरात पुरुष प्रशिक्षकांचे विविध प्रशिक्षण वर्ग कार्यरत असताना, दोन सख्ख्या बहिणी आणि महिला प्रशिक्षिका मिळून चालवत असलेले ‘ईगल तायक्वांदो केंद्र’ हे रत्नागिरी शहरातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र ठरले आहे.

​शालेय वयात सुरुवातीला वाटणाऱ्या भीतीवर मात करत संकेताने सराव सुरू केला आणि पहिल्याच सुवर्णपदकासह तिच्या यशाचा आलेख चढता राहिला. “मुलांचा मारामारीचा खेळ” म्हणून सुरुवातीला होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करत तिने जिल्हा, राज्य व विद्यापीठ स्तरावर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली. 2nd Dan ब्लॅक बेल्ट मिळवण्यासोबतच तिने राष्ट्रीय पंच परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. तालुका, जिल्हा, राज्य आणि थेट राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये तिने अधिकृत पंच म्हणून निष्पक्ष कामगिरी बजावली आहे. ज्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून शिकताना तिने विद्यापीठ पदक जिंकले होते, त्याच महाविद्यालयात नुकत्याच 25 ते 28 ऑक्टोबर 26 या काळात झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सलग तीन दिवस पंच म्हणून उत्तम जबाबदारी सांभाळली. यावेळी तिचा गौरव करण्यात आला.

​संकेताच्या याच क्रीडा प्रवासाने प्रेरित होऊन तिची धाकटी बहीण सई सावंत हिनेही या मैदानात प्रवेश केला. राज्य आणि विद्यापीठ स्तरावर पदक मिळवत ती 1st Dan ब्लॅक बेल्ट झाली आणि राष्ट्रीय पंच परीक्षेत यश मिळवले. गेल्या दोन वर्षांपासून या दोन सख्ख्या बहिणींनी नाचणे रोड, अभ्युदय नगर येथे ‘ईगल तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले आहे . या केंद्रात संकेता मुख्य प्रशिक्षक तर सई सहप्रशिक्षिका म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अनेक मुले-मुली जिल्हा व संघटनात्मक स्पर्धांमध्ये तसंच बेल्ट एक्साममध्ये उत्तम यश मिळवत असून, मुलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक कणखरता निर्माण होत असल्यामुळे पालकांकडून या दोघींच्या प्रशिक्षणाला मोठी पसंती मिळत आहे.

​संकेताला एक यशस्वी खेळाडू ते मुख्य प्रशिक्षक म्हणून घडवण्यात मिलिंद भागवत आणि शाहरुख शेख यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. संघटनेच्या पातळीवर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, पंच प्रमुख भरत कररा यांचं नेहेमीच मार्गदर्शन मिळतं. नवीन केंद्र सुरू करताना राम कररा व शशीरेखा कररा यांचे बहुमोल सहकार्य लाभले. तिच्या खेळाडू म्हणून झालेल्या प्रवासात प्रशांत मकवाना यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे .

संकेताच्या या वाटचालीत आई सोनाली सावंत, वडील संदेश सावंत, आजी संपदा सावंत आणि आजोबा संभाजी सावंत यांच्यासह संपूर्ण सावंत कुटुंबीयांनी अभ्यासाच्या नावाखाली मुलींचा खेळ कधीही थांबवला नाही. महागड्या शिकवण्यांशिवाय मुलींनी पदवीपर्यंतचे शिक्षण उत्तम गुणांनी पूर्ण करत खेळातील प्रावीण्य टिकवून ठेवले.

 

चौकट –

​पालकांची भूमिका: अभ्यासाच्या शर्यतीत खेळाकडे दुर्लक्ष नको!

आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीसाठी शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मरक्षणासाठी मैदानी खेळांची नितांत गरज आहे. मात्र आजही अनेक पालक मुले आठवी-नववीत किंवा दहावी-बारावीत गेली की अभ्यासाच्या आणि टक्क्यांच्या स्पर्धेत त्यांना खेळापासून दूर करतात. महाविद्यालयीन स्तरावर पोहोचेपर्यंत अनेक गुणवान खेळाडूंचा प्रवास यामुळे थांबतो. खेळ ही तात्पुरती आवड नसून एक व्रत आहे; जसा एक विद्यार्थी अनेक वर्षांच्या अभ्यासाने शिक्षक होतो, तसेच 18 वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीनंतर एक खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक घडतो. त्यामुळे पालकांनी केवळ मार्कांचे ओझे न लादता मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन संकेता आणि सावंत कुटुंबीयांनी केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें