कुंभमेळ्याच्या ३६ हजार कोटींच्या निधीत ५० टक्के भ्रष्टाचाराची मलई; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

# कुंभमेळ्याच्या ३६ हजार कोटींच्या निधीत ५० टक्के भ्रष्टाचाराची मलई; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

**कुंभमेळ्याच्या पवित्रतेलाही भाजपा-महायुती सरकारने भ्रष्टाचारापासून दूर ठेवले नाही; सहकार क्षेत्रातही सत्ता हस्तगत करण्यासाठी कायद्यात बदल केल्याचा बाळासाहेब थोरात यांचा आरोप

नाशिक :- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ३६ हजार कोटी रुपयांच्या निधीवरून काँग्रेसने राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. या निधीतील तब्बल ५० टक्के रक्कम भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हडप केली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तसेच कुंभमेळ्याच्या नावाखाली विकासकामांऐवजी भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

उत्तर महाराष्ट्र विभागातील लोकसभा, विधानसभा, जिल्हा प्रभारी आणि जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक नाशिक येथे काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार शोभा बच्छाव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) अॅड. गणेश पाटील, शरद आहेर, अभिजित सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ यांनी कुंभमेळ्याच्या कामांवरून सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, नाशिक कुंभमेळ्यासाठी सरकारने ३६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून विकासकामे होत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात भ्रष्टाचाराचे प्रकार सुरू आहेत. मंडपासाठी २२ कोटी रुपये, हेलिपॅडसाठी ३ कोटी रुपये, तर सीसीटीव्ही यंत्रणेसाठी ३५० कोटी रुपये खर्च केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

विकासकामांच्या नावाखाली पद्धतशीरपणे भ्रष्टाचार सुरू असून, निधीतील ५० टक्के रक्कम मलई म्हणून खाल्ली जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. नाशिकमधील अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बोगस वर्क ऑर्डर काढल्या जात असल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारासाठी विशेष मंत्र्याची नियुक्ती केल्याचा दावाही त्यांनी केला.

समुद्रमंथनानंतर अमृतकुंभातील अमृताचे थेंब पृथ्वीवरील चार ठिकाणी पडल्याची धार्मिक मान्यता आहे. त्यापैकी नाशिक हे एक महत्त्वाचे ठिकाण असून, येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. मात्र, या पवित्र सोहळ्याच्या नावाखाली सरकार भ्रष्टाचाराचे विष पेरत असल्याची टीका सपकाळ यांनी केली.

दरम्यान, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सहकार क्षेत्रातील बदलांवरून भाजपा-महायुती सरकारवर निशाणा साधला. भाजप सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जात असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आता सहकार क्षेत्रातही हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेचा संदर्भ देताना थोरात म्हणाले की, सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या पॅनलला स्पष्ट बहुमत असतानाही कोरमचा मुद्दा उपस्थित करून अध्यक्ष निवड रोखण्यात आली. ज्या गटाला बहुमत आहे, त्यालाच अध्यक्ष निवडीचा अधिकार असायला हवा. मात्र, सरकारने कायद्यात बदल करून आडमार्गाने गोकुळची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.

सरकारकडून चार सदस्य नियुक्त करण्याची तरतूद करण्यात येत असून, हा प्रकार सहकार क्षेत्रासाठी घातक आहे. हा कायदा केवळ गोकुळपुरता मर्यादित न राहता संपूर्ण सहकार क्षेत्रातील संस्थांना लागू होऊ शकतो. त्यामुळे भाजपा-महायुती सरकार सहकार क्षेत्र मोडीत काढण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याची टीका थोरात यांनी केली. या पापाचे धनी मुख्यमंत्र्यांनी होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

या आढावा बैठकीत नाशिकमध्ये झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या शिबिराचा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक दिशा आणि कार्यपद्धती याबाबतही चर्चा करण्यात आली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें