आंबा-काजू उत्पादक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित; ५० हून अधिक शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही!
नुकसानभरपाईचा निधी मंजूर होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा नाही; आनंद भोजने यांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
गुहागर : गुहागर तालुक्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यात होत असलेल्या विलंबाबाबत शिवस्वराज्य शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील ५० हून अधिक शेतकरी अद्याप नुकसानभरपाईपासून वंचित असल्याचा दावा संघटनेने केला असून, तातडीने भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भोजने यांनी तहसीलदार, गुहागर यांच्यामार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर केले आहे
निवेदनात नमूद केल्यानुसार, २०२६ पासून ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत बराच कालावधी उलटून गेला असतानाही गुहागर तालुक्यातील अनेक आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. उपलब्ध यादीनुसार अंदाजे ५० हून अधिक शेतकरी या भरपाईपासून वंचित असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी निधी मंजूर झालेला असतानाही संबंधित शेतकऱ्यांना त्याचा लाभ वेळेत मिळत नसल्याबद्दल निवेदनात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मंजूर झालेला निधी अन्य योजनांकडे वळविण्यात आला आहे का, याबाबतही प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासनाने लाडक्या बहिणींसाठी आर्थिक मदत देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि अभिमानास्पद असल्याचे संघटनेने म्हटले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी मंजूर झालेला निधी त्याच उद्देशासाठी वापरला जावा, ही संघटनेची ठाम भूमिका आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यानंतर गुहागर तालुक्यातील भात व नाचणी पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही अद्याप शासनाकडून मदत मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आंबा, काजू तसेच भात व नाचणी पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी. या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी आनंद भोजने यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई वेळेत मिळणार का, याकडे आता गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.











