“तुम्ही अनुभवी राजकारणी आहात, बोलताना संयम बाळगायला हवा”; सर्वोच्च न्यायालयाचे संजय राऊतांना खडेबोल
माफी मनापासून असावी, केवळ औपचारिकतेसाठी नाही! न्यायालयाची टिप्पणी; संजय राऊत आणि निखिल वागळे यांना ८ डिसेंबरपर्यंत अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी सुनावणीदरम्यान चांगलेच सुनावले. ‘तुम्ही अनुभवी राजकारणी आहात, अनेक वर्षे संसदेत आहात. त्यामुळे बोलताना कोणता संयम बाळगायला हवा, याची तुम्हाला जाणीव असायला हवी,’ अशा शब्दांत न्यायालयाने राऊत यांना सुनावले.
संजय राऊत यांनी भारताचे सरन्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयात अवमान कारवाई सुरू आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राऊत प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित होते. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
माफीबाबत न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील प्रदीप राय यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सांगितले की, संजय राऊत यांनी यापूर्वी आपल्या वक्तव्यांबद्दल माफी मागितली असली, तरी त्यानंतरही त्यांनी सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात पोस्ट केल्या आहेत.
विशेषतः अल्बेनियाच्या सर्वोच्च न्यायालयाला आंदोलकांनी आग लावल्याचा फोटो राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. राऊत यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या नंतरच्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख नसल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
राय यांनी राऊत यांना ‘Habitual Offender’ अर्थात वारंवार अशा प्रकारचे वर्तन करणारे, असे संबोधले. तसेच, ‘ते एका सन्माननीय पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून काही जबाबदारीची अपेक्षा आहे. अशा प्रकरणात कठोर भूमिका घेण्याची गरज आहे,’ असे मत त्यांनी मांडले.
‘माफी मनापासून असावी, केवळ मनाचा विचार करून नव्हे!’
या युक्तिवादाची दखल घेत न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी राऊत यांच्या माफीनाम्याबाबत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
‘एवढ्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात माफी ही मनापासून आलेली असली पाहिजे, केवळ मनाने घेतलेला निर्णय किंवा औपचारिकता म्हणून ती असू नये,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले.
त्यानंतर न्यायमूर्ती कुमार यांनी संजय राऊत यांना थेट उद्देशून म्हटले की, ‘श्री. संजय राऊत, तुम्ही एक अनुभवी राजकारणी आहात. आम्ही वकील असतानापासून तुमची भाषणे ऐकत आलो आहोत. तुम्ही अनुभवी संसदपटू आहात आणि स्वतः पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम केले आहे. त्यामुळे बोलताना कोणता संयम बाळगायला हवा, हे तुम्हाला माहीत असायला हवे.’
राऊत आणि निखिल वागळे यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्राचे आदेश
या प्रकरणात पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधातही न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप असून त्यांच्यावरील कारवाईची सुनावणीही याचवेळी झाली.
न्यायालयाने संजय राऊत आणि निखिल वागळे या दोघांनाही त्यांच्या संबंधित सोशल मीडिया पोस्टबाबत सविस्तर भूमिका मांडणारे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ डिसेंबर रोजी होणार असून, दोघांनीही पुढील सुनावणीवेळी उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय नेमकी कोणती भूमिका घेणार आणि राऊत यांच्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रानंतर न्यायालयाचा पुढील निर्णय काय असेल, याकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












