इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना पूर्णविराम देण्याची गरज; सामनातून सल्ला.
मुंबई-राज्यात लोकसभेला महाराष्ट्रात इंडिया आघाडीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर विधानसभेतही हेच वारं राहील अशी आशा होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत वेगळंच घडलं अन् पुन्हा भाजपाची सत्ता आली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर या आघाडीती मित्रपक्षांमधील वाद चव्हाट्यावर येऊ लागली आहे. परिणामी इंडिया आघाडीलाही ग्रहण लागलं आहे. दिल्ली निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे. कारण, आप आणि तृणमूलने काँग्रेसला नाकारल्याने काँग्रेस एकटी पडली आहे. एकाच आघाडीतील मित्र पक्षांची देशपातळीवर अशी अवस्था झाल्याने आगामी काळात ही आघाडी अस्तित्वात राहील नाही, याची शाश्वती देता येत नाही. यावरूनच, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे.
देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक त्रांगडेच झाले आहे, अशी भावना लोकांत निर्माण झाली असेल तर त्यास जबाबदार कोण? या दोन्ही आघाड्या निर्माण झाल्या व कामास लागल्या तेव्हा आघाडीतील प्रत्येक घटक पक्षात आणि एकंदरीत जनमानसात उत्साह निर्माण झाला. देशावर लादलेला मनमानी कारभार, भ्रष्टाचार याविरुद्ध लढणारी एक शक्ती निर्माण झाल्याचा आत्मविश्वास भारतीयांत संचारला होता. देशात मोदींचा व महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारचा पराभव होऊ शकतो ही भावना विजेसारखी तळपू लागली, पण आता या दोन्ही आघाड्या निस्तेज आणि निष्क्रिय ठरत आहेत काय? देशासाठी हे बरे नाही, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला म्हणतात, या आघाडीची शेवटची बैठक १ जून २०२४ ला झाली होती. त्यानंतर हरयाणा, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्र, झारखंडच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसला मोठी झेप घेता आली नाही. हरयाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलाच पराभव पत्करावा लागला. त्यानंतर इंडिया आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्न विचारले जाऊ लागले. ममता बॅनर्जी यांनी तर जाहीरपणे सांगितले की, ‘इंडिया आघाडी’ मीच बनवली आणि आता संधी मिळाली तर या आघाडीचे नेतृत्व करायला मी तयार आहे. याचा दुसरा अर्थ काँग्रेसचे नेतृत्व काहीना मान्य नाही. त्यामुळे इंडिया आघाडीचा वृक्ष बहरताना दिसत नाही. लालू यादव यांनीही तीच समांतर भूमिका मांडली, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
विविध राज्यात काँग्रेस एकाकी पडली आहे, यावरून अग्रलेखात म्हटलं आहे की, “पंजाब आणि दिल्लीत आप व काँग्रेस एकमेकांविरुद्ध उभे आहेत. केरळात काँग्रेस आणि डाव्यांची लढाई आहे. प. बंगालात तृणमूलविरुद्ध काँग्रेसचा सामना चालूच राहणार आहे व त्यास पर्याय नाही. कारण प्रत्येक प्रादेशिक पक्षाला आपापली भूमिका, कार्यकर्ते व अस्तित्व टिकवायचेच आहे आणि काँग्रेस पक्ष हेच समजून घ्यायला तयार नाही. काँग्रेस अनेक राज्यांत स्वबळावर लढू शकत नाही. तेवढे लढण्याचे बळ नाही, पण प्रादेशिक पक्षाच्या ताटातील वाटीत बोटे घालणेही सोडत नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात त्याचा परिणाम पाहायला मिळाला. एक सत्य स्वीकारायला हवे ते म्हणजे भाजपाच्या गुहेत शिरलेल्या मित्रपक्षांचा सुपडा साफ झाला. त्या वृत्तीने काँग्रेसने वागता कामा नये. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे व राहील. त्याबाबत कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पावसाळ्यात निर्माण झालेले गांडूळ किंवा बेडूक हे पावसाळा संपताच नष्ट होतात. निवडणुकीसाठी निर्माण झालेल्या ‘इंडिया’सारख्या आघाड्यांचे जीवन अल्प न ठरता ते सदैव राष्ट्रकार्यासाठी समर्पित असावे या मताचे आम्ही आहोत. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण निवडणुका ‘हायजॅक’ करून देशावर ताबा मिळवणाऱ्या राजकीय माफियांविरुद्ध इंडिया आघाडीला लढ्याचा एल्गार पुकारावा लागेल व त्यासाठी हेवेदावे, जळमटे, कुरघोड्यांना पूर्णविराम देण्याची गरज आहे, असा सल्लाच अग्रलेखातून देण्यात आला आहे.