अजून किती श्रमदानांची लोकप्रतिनिधी आणि शासनाला अपेक्षा
???? तळवली हॉस्पिटल स्टॉप रस्त्याची पुन्हा डागडुजी
तळवली ग्रामदेवता देवस्थानचा सामाजिक उपक्रम
गुहागर (आशिष कर्देकर प्रतिनिधी ) –तळवली हॉस्पिटल स्टॉप या रस्त्याच्या कामाला अजूनही मुहूर्त सापडत नाही.रस्ते,पाणी पाखड्या ही कामे जर ग्रामस्थांनी श्रमदानातून करायची असतील तर मग प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय करणार असा सवाल आता जनतेतून उपस्थित होतोय.वारंवार या रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ सध्या येथील ग्रामस्थ, सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संघटना यांच्यावर आली आहे.
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व विविध उपक्रम राबविणाऱ्या श्री सुकाई देवी ग्रामदेवता देवस्थानच्या वतीने नुकतीच तळवली हॉस्पिटल स्टॉप रस्त्याची डागडुजी करण्यात आली.देवस्थानने राबविलेल्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या उपक्रमासाठी सामाजिक दायित्व असलेले विनोद मयेकर व विवेक मयेकर तसेच निगुंडळ पोलीस पाटील प्रकाश आंबवकर यांनी मोठे सहकार्य केले.यावेळी तळवली ग्रामदेवता कमिटी सचिव प्रदीप चव्हाण, खजिनदार अनंत डावल,चंद्रकांत बोटके,दिलीप आग्रे,तेजस कळंबाटे,पत्रकार उत्तम पवार,अमित पोफळे,उमेश पवार आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे या रस्त्यावर अनेक वेळा डागडुजी झाली आहे.यापूर्वी तळवली ग्रामपंचायत,श्री समर्थ बैठक पंथ,भाजपा पक्ष यांनी देखील याठिकाणी भर पावसात खड्डे बुजवून प्रवाशांचा प्रवास थोडाफार सुखकर करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र कालांतराने परिस्थिती “जैसे थे” होत असल्याने नागरिकही अक्षरशः कंटाळले आहेत.मात्र वारंवार निवडून येणाऱ्या आणि केवळ निवडणूका आल्या की धावून हात जोडण्याऱ्या लोकप्रतिनिधींना याचे कोणतेच सोयर-सुतक नाही.त्यामुळे अजून नक्की किती श्रमदानांची अपेक्षा शासनाला आणि लोकप्रतिनिधींना आहे असा सवाल आता संतप्त प्रवासी वर्गातून होत आहे
अजून किती श्रमदानांची लोकप्रतिनिधी आणि शासनाला अपेक्षा