पाटपन्हाळे विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात पर्यवेक्षक जी.डी.नेरले यांच्या अध्यक्षतेत मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. दीपप्रज्वलन , ज्येष्ठ साहित्यिक व कवीवर्य कुसुमाग्रज प्रतिमा पूजन , विद्यार्थी मनोगत व शिक्षकवृंदांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयातील सांस्कृतिक विभागातर्फे मान्यवर प्राध्यापक- शिक्षकवृंद व विद्यार्थी यांचे शाब्दिक स्वागत करून मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ज्येष्ठ साहित्यिक कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाध्यक्षांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे पर्यवेक्षक जी.डी.नेरले यांनी भूषविले .कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून पर्यवेक्षक जी.डी.नेरले , सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण , प्रा.सौ.एम. एस.जाधव , प्रा.एस.एस.मोरे उपस्थित होते. मान्यवरांचा व विद्यार्थी प्रतिनिधी यांचे सांस्कृतिक विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कु. समृद्धी आंबेकर , मृण्मयी जाधव , मानसी पालकर , मैथिली कदम , संजना चव्हाण या विद्यार्थिनींनी मराठी भाषा , कवीवर्य कुसुमाग्रजांचा जीवन परिचय व साहित्य क्षेत्रामधील कार्य , मराठी भाषेचे महत्व , आदी मुद्द्यांनुसार मनोगत व्यक्त केले . मार्गदर्शक प्रा.सौ.एम.एस.जाधव यांनी जेष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांचे साहित्य क्षेत्रामधील कार्य , मराठी वाड्मयाची ओळख , मराठी भाषेचे महत्व , प्रा.एस. एस.मोरे यांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा उद्देश , कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेला लाभलेले योगदान , वाचनाचे महत्त्व व वाचनाची सवय तसेच कार्यक्रमाध्यक्ष व पर्यवेक्षक प्रा.जी.डी.नेरले यांनी मातृभाषेचे महत्व , मराठी साहित्य संमेलनाचे महत्व , ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांचे साहित्य क्षेत्रामधील योगदान आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण यांनी केले.