शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय कदम यांची पक्षातून हकालपट्टी
रत्नागिरी – उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार संजय वसंत कदम यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, कदम यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय कदम शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यांनी अधिकृतरीत्या याबाबत कोणतीही घोषणा केलेली नव्हती. तरीही त्यांच्या हालचालींवरून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात होते.
ठाकरे गटाने जारी केलेल्या अधिकृत पत्रकात, संजय कदम यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षशिस्त मोडणाऱ्या या कृतीचा निषेध करत, त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
संजय कदम हे ठाकरे गटातील महत्त्वाचे नेते मानले जात होते. मात्र, पक्षांतर्गत घडामोडींमुळे आणि त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या हालचालींमुळे त्यांची हकालपट्टी झाली आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.