लाडकी बहीण योजनेचा निधी कमी; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
मुंबई – राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप करत, लाडकी बहीण योजनेतील निधी कमी करून बहिणींची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात कमी मदत का?
आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, “दिल्लीमध्ये भाजप सरकारच्या लाडकी बहिणींना दरमहा 2,500 रुपये दिले जातात, तर महाराष्ट्रातील बहिणींना केवळ 1,500 रुपये मिळतात. महाराष्ट्राच्या बहिणींवर हा अन्याय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
2100 रुपये द्यायचे होते, पण…?
राज्य सरकारने यावेळी लाभार्थींना 2,100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र तेही न दिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. “आम्ही सत्तेत असतो तर लाडक्या बहिणींना दरमहा 3,000 रुपये दिले असते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेसाठी निधी कमी
गेल्या वर्षी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, यंदा हा निधी कमी करून 36,000 कोटी रुपयांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे सरकार लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.
“कुणाचाही हक्क हिरावला जाऊ नये”
सरकारने कोणत्याही लाभार्थींवर अन्याय न करता योजनेतील सर्व महिलांना संपूर्ण लाभ मिळावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. यासोबतच, त्यांनी सरकारवर निवडणुकीपूर्वी आश्वासनं देऊन फसवणूक केल्याचा आरोप केला.
राजकीय वर्तुळात चर्चा रंगली
आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांमुळे लाडकी बहीण योजनेवरून राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आता सरकार यावर काय उत्तर देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.















