देवरूख आगाराला मिळाल्या ५ नवीन अत्याधुनिक बसेस; प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण
,संगमेश्वर (प्रतिनिधी) – देवरूख एस.टी. आगाराला ५ नवीन अत्याधुनिक बसेस मिळाल्या असून, या बसेसच्या लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून देवरूख एस.टी. आगारात बस कमतरतेचा प्रश्न गंभीर झाला होता. जुन्या बसेस सतत बिघडत होत्या, वेळापत्रकावर परिणाम होत होता, तसेच प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम आणि स्थानिक एस.टी. प्रेमी यांच्यातर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, महाराष्ट्र शासनाने देवरूख आगाराला ५ नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या.
या बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला युवा नेते अनिरुद्ध निकम, चिपळूणच्या माजी पंचायत समिती सभापती सौ. पुजाताई निकम, देवरूख आगारव्यवस्थापक सौ. रेश्मा मधाळे, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच स्थानिक एस.टी. प्रेमी, प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि आगारातील कर्मचारी यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला.
आमदार शेखर निकम यांचे विशेष योगदान
आमदार शेखर निकम यांनी आगारातील बस कमतरतेच्या प्रश्नावर सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला. परिवहन मंत्र्यांना निवेदन दिले आणि महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा प्रभावीपणे मांडला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज ५ नवीन बसेस देवरूख आगाराला मिळाल्या असून, यामुळे प्रवाशांत समाधानाचे वातावरण आहे.
“लालपरीच्या आगमनाने आनंद” – आमदार शेखर निकम
बस लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहता न आल्याची खंत व्यक्त करताना आमदार शेखर निकम म्हणाले, “राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे मी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही, पण देवरूख आगारात नवीन लालपरी दाखल झाल्याचा मनस्वी आनंद आहे.”
एस.टी. प्रेमींचा पाठपुरावा आणि यशस्वी लढा
स्थानिक प्रवासी संघटना, ‘आपले देवरूख – सुंदर देवरूख’ ग्रुप आणि ‘३६१९ देवरूखची राणी प्रेमी मित्र परिवार’ यांनी हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला. आमदार निकम यांनी या मागणीसाठी शासनदरबारी ठोस प्रयत्न केले आणि अखेर यश मिळवले. पालकमंत्री उदय सामंत यांचेही या निर्णयामध्ये मोलाचे सहकार्य लाभले.
प्रवाशांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
बसेसच्या नव्या ताफ्यामुळे प्रवास सुखकर होणार असल्याचे स्थानिक प्रवाशांनी सांगितले. “जुन्या बसेस सतत बिघडत होत्या, वेळापत्रक कोलमडत होते. आता नव्या बसेस मिळाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेळेवर होईल,” अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
या लोकार्पण सोहळ्यानंतर नव्या बसेस लवकरच मार्गावर धावू लागतील, असे आगार प्रशासनाने सांगितले. नवीन बसेस मिळाल्याने देवरूख परिसरातील प्रवाशांना मोठादिलासा मिळणार आहे.