धार्मिक एकोपा ही कोकणची संस्कृती; धार्मिक सलोखा बिघडल्यास विकासावर गंभीर परिणाम – सुहास खंडागळे
रत्नागिरी: “कोकण हा शांतताप्रिय आणि धार्मिक सलोख्याचा आदर्श प्रदेश आहे. मात्र, अलीकडे काही प्रवृत्ती धार्मिक कट्टरतेचे विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जर वेळेत योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर याचा थेट फटका कोकणच्या विकासाला बसेल,” असा स्पष्ट इशारा गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी दिला आहे.
कोकण आधीच विकासाच्या बाबतीत मागे आहे. अशा परिस्थितीत जर धार्मिक द्वेष वाढला, तर संपूर्ण समाजाचे नुकसान होईल. “शांतताप्रिय कोकणाला धार्मिक द्वेषाची प्रयोगशाळा बनवण्याचे प्रयत्न सुरू असतील, तर शासनाने त्यावर वेळीच कठोर कारवाई करावी,” अशी मागणी खंडागळे यांनी केली आहे.
कोकणातील धार्मिक सलोखा – एक आदर्श परंपरा
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हे धार्मिक सौहार्दाचे प्रतीक आहेत. हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि अन्य धर्मीय वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात. “इथे कधीही कुणाकडून काय खरेदी करायचे यावर वाद झाले नाहीत. उलट एकमेकांच्या सण-उत्सवांमध्ये सहभागी होण्याची कोकणी परंपरा आहे,” असे खंडागळे यांनी सांगितले.
मात्र, गेल्या काही वर्षांत धार्मिक तेढ निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. कोकणी जनतेनेही यावर विचार करायला हवा आणि समाजात कट्टरतेच्या प्रवृत्तीला थारा देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
सणासुदीच्या काळात धार्मिक द्वेष वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई झाली पाहिजे, असे खंडागळे म्हणाले. “धार्मिक तेढ निर्माण करणारी व्यक्ती कोणत्याही धर्माची असो, सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे,” असा ठाम आग्रह त्यांनी धरला आहे.
“शासनात जबाबदारीच्या पदांवर असलेल्या कोकणातील व्यक्तींनी पुढाकार घ्यायला हवा. धार्मिक सलोखा जपण्याचे कार्य सर्वांनी मिळून करायला हवे, जेणेकरून कोकणाचा विकासाचा मार्ग मोकळा होईल,” असेही खंडागळे यांनी स्पष्ट केले.
धार्मिक सलोखा जपला तरच कोकणाचा
विकास – खंडागळे