रत्नागिरीत कौशल्य विकास आणि पर्यटनवाढीसाठी महत्त्वपूर्ण पायाभरणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरीत कौशल्य विकास आणि पर्यटनवाढीसाठी महत्त्वपूर्ण पायाभरणी

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन

 

रत्नागिरी | १७ मार्च २०२५

 

रत्नागिरी जिल्ह्यात आज तरुणांसाठी कौशल्य विकास आणि पर्यटनवाढीला चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. या उपक्रमांमध्ये रत्न टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर, भगवती किल्ल्यावर उभारण्यात आलेली शिवसृष्टी (दुसरा टप्पा) आणि थिबा पॅलेस येथील थ्रीडी मल्टीमीडिया शो यांचा समावेश आहे.

 

तरुणांसाठी रोजगार संधी – रत्न टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर

 

रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदानात आज संध्याकाळी ४ वाजता रत्न टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या सुमारे ३,००० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार असून, उद्योग क्षेत्रात त्यांना अधिक संधी उपलब्ध होतील.

 

शिवसृष्टीचा दुसरा टप्पा खुला

 

भगवती किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण आज होणार आहे. मागील वर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात पहिला टप्पा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे दर्शन घडवणारी ही शिवसृष्टी इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

 

थिबा पॅलेस येथे थ्रीडी मल्टीमीडिया शो

 

पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी थिबा पॅलेस येथे थ्रीडी मल्टीमीडिया शो सुरू करण्यात येत आहे. हा शो आज रात्री ८ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पित होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोकणच्या समृद्ध इतिहासाचे आणि निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवणारा हा शो पर्यटकांना खास अनुभव देणार आहे.

 

कोकणच्या विकासाला नवा वेग

 

राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून हे प्रकल्प साकारत आहेत. यामुळे कोकणातील तरुणांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळेल, उद्योगसंधी वाढतील आणि पर्यटनाला नवे आयाम प्राप्त होतील. निसर्गसंपन्न कोकणात अशा आकर्षक उपक्रमांची भर पडल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

 

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...