एसटी बसस्थानकांवर ‘नाथजल’साठी जादा पैसे? प्रशासनाकडून दुर्लक्ष!
रत्नागिरी – उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे प्रवासात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एसटी महामंडळाने अधिकृतरित्या बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची विक्री करण्यास परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्षात अनेक बसस्थानकांवर याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
‘नाथजल’ऐवजी दुसऱ्या ब्रँडच्या बाटल्या विक्रीस
एसटी महामंडळाच्या नियमांनुसार बसस्थानक परिसरात केवळ ‘नाथजल’ विक्रीस परवानगी आहे. मात्र, काही बसस्थानकांवर विक्रेते बाहेरून आणलेल्या अन्य ब्रँडच्या पाण्याच्या बाटल्या विकत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती अधिकच बळावत असून, प्रवाशांना अनावश्यक खर्च सहन करावा लागत आहे.
१५ रुपयांचे पाणी २० रुपयांना?
महामंडळाने एका लिटर ‘नाथजल’ची किंमत १५ रुपये निश्चित केली आहे. तरीही अनेक बसस्थानकांवर प्रवाशांकडून २० रुपये वसूल केले जात आहेत. जादा दराने विक्री केल्यास दंडात्मक कारवाईचा नियम असतानाही, याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.
तक्रार करायची, पण कुणाकडे?
महामंडळाच्या सूचनेनुसार, १५ रुपयांपेक्षा अधिक दराने ‘नाथजल’ विकल्यास बसस्थानक प्रमुख अथवा आगार व्यवस्थापकांकडे तक्रार करता येते. मात्र, बहुतांश प्रवासी तक्रार करण्यास टाळाटाळ करतात, याचा फायदा विक्रेत्यांना होत आहे.
प्रशासन कारवाई करणार का?
एसटी प्रशासनाने यावर त्वरित लक्ष केंद्रित करून अधिकृत ‘नाथजल’च योग्य दरात विक्रीसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत. अन्यथा, उष्णतेच्या लाटेत प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची गरजआहे.
– प्रतिनिधी