युक्रेनचा रशियावर जोरदार हल्ला; एअरबेस उद्ध्वस्त
कीव: रशिया-युक्रेन युद्धाला आणखी तीव्रता मिळाली आहे. युक्रेनने गुरुवारी रशियाच्या एंगेल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामुळे प्रचंड स्फोट झाला, ज्यामुळे धुराचे आणि ज्वाळांचे लोट उठले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हा हल्ला युद्धाच्या मुख्य आघाडीपासून तब्बल ७०० किलोमीटर दूर झाला.
रशियाचे मोठे नुकसान
या हल्ल्यात रशियाचा सोव्हिएत काळातील एंगेल्स बॉम्बर बेस मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाला आहे. येथे रशियाचे अत्याधुनिक टुपोलेव्ह टीयू-१६० अणु-सक्षम हेवी बॉम्बर तैनात होते. हल्ल्यानंतर एंगेल्स शहरात आग लागली, तसेच स्थानिक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. साराटोव्ह प्रदेशाचे गव्हर्नर रोमन बुजार्गिन यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
रशियाची प्रतिक्रिया
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी १३२ युक्रेनियन ड्रोन नष्ट केले आहेत. मात्र, बेसवरील नुकसानीबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. एंगेल्स जिल्ह्याचे प्रमुख मॅक्सिम लिओनोव्ह यांनी स्थानिक आणीबाणी जाहीर केली आहे.
युक्रेनचा सातत्यपूर्ण हल्ला
युक्रेनने यापूर्वीही डिसेंबर २०२२ मध्ये एंगेल्स एअरबेसवर हल्ला केला होता. तसेच, जानेवारीमध्ये तेल डेपोवर हल्ला केला होता, ज्यामुळे पाच दिवस आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. यावेळीही युक्रेनने सिझरान शहरातील तेल शुद्धीकरण कारखान्यावर ड्रोन हल्ला केला आहे.
युद्ध अजून तीव्र होणार?
अमेरिका आणि युरोपीय देश युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत असले तरी, युक्रेन आणि रशिया एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. रशिया पुढील उत्तर कसे देतो, याकडे आता संपूर्णजगाचे लक्ष आहे.