तवसाळ मध्ये बेकायदा एलईडी मासेमारीचा सुळसुळाट – स्थानिक मासेमारांचे जगणे कठीण!
गुहागर (सुजित सुर्वे) _ तालुक्यातील तवसाळ खुर्द आणि जयगड खाडी परिसरात बेकायदा एलईडी मासेमारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, रात्रीच्या काळोखात मोठमोठ्या नौका समुद्रात अवैध मासेमारीसाठी उतरत आहेत. या नौकांवर जनरेटर आणि शक्तिशाली एलईडी दिव्यांचा वापर करून मासे आकर्षित केले जात असून, स्थानिक मासेमारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रशासनाच्या मूग गिळून बसण्याने, हा गैरव्यवहार दिवसेंदिवस बळावत आहे.
गुप्त हालचाली – अवैध मासेमारीसाठी जयगड खाडीचा आश्रय
या बेकायदा मासेमारीसाठी आवश्यक असलेले जनरेटर आणि एलईडी दिवे तवसाळ बंदरातून उतरवले जात असून, ते तवसाळ खुर्द येथे आणले जात आहेत. रात्रीच्या अंधारात हायड्राच्या मदतीने नौकांवर हे साहित्य चढवले जाते आणि मासेमारीला सुरुवात होते. मासेमारी झाल्यावर पुन्हा संपूर्ण साहित्य किनाऱ्यावर उतरवले जाते, त्यामुळे प्रशासनाला कोणतेही ठोस पुरावे मिळत नाहीत.
बडे व्यावसायिक आणि बाहेरून आलेले कामगार – स्थानिक मासेमारांवर अन्याय
ही अवैध मासेमारी स्थानिकांकडून नाही, तर बड्या व्यावसायिकांच्या नौकांद्वारे चालवली जात आहे. या नौकांवर कर्नाटकातील मजूर काम करत असून, स्थानिक मासेमारांना संधीच मिळू नये यासाठी त्यांना दडपले जात आहे. यामुळे स्थानिक मासेमारांचे संपूर्ण जगणे धोक्यात आले असून, त्यांच्या पारंपरिक मासेमारी व्यवसायावर टाच आली आहे.
हायड्राचा गैरवापर – दोन गटांमध्ये हाणामारी!
तवसाळ ते जयगड पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्राचा गैरवापर करून बेकायदा मासेमारीचे साहित्य नौकांवर चढवले जाते. या प्रकारातून दोन गटांमध्ये तणाव वाढला असून, नुकतीच स्थानिक तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर या बेकायदा धंद्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.
ग्रामस्थ संतप्त – प्रवासी जेटी बेकायदा वाहतुकीचे केंद्र!
तवसाळ येथील प्रवासी जेटी आता बेकायदा मासेमारीसाठी वापरण्यात येत आहे. येथे मासेमारीचे साहित्य चढवले आणि उतरवले जात असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या अवैध कारवाईमुळे गावात अस्वस्थता निर्माण झाली असून, स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
प्रशासन जागे होणार का? – कारवाईचे आश्वासन
जिल्हा मत्स्य आयुक्त सागर कुवेस्कर यांनी सांगितले की, “या बेकायदा मासेमारीवर कारवाई करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. लवकरच 12 तासांची विशेष गस्त ठेवली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल.”
तालुका मत्स्य अधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी सांगितले की, “मी दोन दिवसांपासून संध्याकाळी गस्त घालत आहे, पण कोणीही मिळून आले नाही. त्यामुळे आता सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रांत गस्त वाढवली जाईल.”
स्थानिकांची मागणी – बेकायदा मासेमारी तात्काळ थांबवा!
गुहागर तालुक्यात सर्वसामान्य मासेमारांचे जगणे कठीण झाले असून, प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरच ही मासेमारी थांबली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
बेकायदा मासेमारीवर कारवाई होईल का? – की प्रशासन डोळेझाकच करत राहील?
तवसाळ आणि जयगड खाडीत दिवस-रात्र सुरू असलेल्या या बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार? हा मोठा प्रश्न आहे. स्थानिकांनी सरकार आणि मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे संपूर्ण प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे.
आता पाहायचे एवढेच की, प्रशासन प्रत्यक्ष कारवाई करणार की, यापुढेही डोळेझाक करत या बेकायदा मासेमारीला मूकसंमती देणार?
# मात्र मिळालेल्या माहितीनुसार गेले ३/४ दिवसा पासून सध्या काहीं दिवस बेकायदा रात्री ची मासेमारी बंद आहे, कोस्टल गार्ड सुद्धा गस्त घालत आहेत….. तरीही सावधान