प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक; कोल्हापूर पोलीसांनी घेतले ताब्यात
मुंबई– इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अखेर प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून तो फरार होता. तेलंगणातून कोल्हापूर पोलिसांनी त्याला आज सोमवारी ताब्यात घेतले.
कोरटकर याने इंद्रजीत सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात कोल्हापूरसह नागपूरमध्येही गुन्हा दाखल झाला होता. तसेच महाराष्ट्रभरातून कोरटकर विरोधात संताप व्यक्त होत होता. अनेक व्यक्ती, संघटना, लोकप्रतिनिधींनी कोरटकरच्या वक्तव्याचा निषेध करत त्याच्यावर तत्काळ कडक कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, कोरटकरने कोल्हापूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज मंजूर झाल्याने 11 मार्चपर्यंत त्याला दिलासा मिळाला होता.
पण, कोल्हापुरातील सामाजिक संघटनांच्या दबावानंतर पोलिसांनी कोरटकर याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता. त्यानंतर आणि त्यापुर्वीही कोल्हापूर पोलिसांनी नागपूरला धाव घेत कोरटकर याचा शोध सुरू केला होता. तथापि, त्याने सुरुवातीला मध्य प्रदेशात पळ काढल्याची चर्चा होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोरटकर याने सुरुवातीला पश्चिम बंगाल आणि त्यानंतर दुबईत पळ काढल्याची चर्चा होती. तथापि, त्यानंतर त्याच्या पत्नीनेच त्याचा पासपोर्ट जमा केल्यानंतर कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याचे स्पष्ट झाले होते. सोमवारी कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणातून ताब्यात घेतल्यानंतर आता त्याच्यावर काय कारवाई केली जाते? याची उत्सुकता आहे.