जम्मू-काश्मिरमध्ये चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा; ३ जवान शहीद
श्रीनगर-जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील घनदाट जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र या चकमकीत जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे ३ जवान शहीद झाले, तर इतर दोन जवान जखमी झाले. ही चकमक गेल्या ४ दिवसांपासून कठुआच्या जंगलात सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच दहशतवादी घनदाट जंगलात लपले होते. सुरक्षा दलांनी जुठाणा भागात त्यांचे नेमके ठिकाण शोधले, त्यानंतर जोरदार गोळीबार सुरू झाला. ही चकमक हिरानगर सेक्टरपासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या जाखोले गावाजवळ झाली. रविवारी (23 मार्च) त्याच भागात पहिली चकमक झाली, ज्यामध्ये दहशतवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराचे विशेष दल मैदानात उतरले. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) नलिन प्रभात यांनीही घटनास्थळी भेट दिली.
गुरुवारी झालेल्या चकमकीत मारले गेलेले दहशतवादी तेच आहेत जे रविवारी हिरानगर चकमकीत पळून जाण्यात यशस्वी ठरले होते, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. 22 मार्चपासून सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. पोलीस, लष्कर, एनएसजी, बीएसएफ आणि सीआरपीएफ एकत्रितपणे ही मोहीम राबवत आहेत. यूएव्ही, ड्रोन, बुलेटप्रूफ वाहने आणि इतर आधुनिक पाळत ठेवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रविवारी (23 मार्च) झालेल्या चकमकीत, हिरानगरच्या सान्याल गावात दहशतवादी लपले होते, गुप्त माहितीच्या आधारे एसओजीने ऑपरेशन सुरू केले होते. ही चकमक सुमारे 30 मिनिटे चालली, परंतु दहशतवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.