एका सामाजिक उपक्रमांतर्गत 70 ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखांच्या आरोग्य कार्डांचे वाटप:
रत्नागिरी विठ्ठल मंदिर संस्था आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा यांच्या वतीने 70 गरजू ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपये रकमेच्या आरोग्य कार्डांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम पंतप्रधानांच्या आरोग्यविषयक घोषणेच्या अनुषंगाने राबवण्यात आला.
आरोग्य समस्यांसाठी आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने हे कार्ड वाटप करण्यात आले असून, यासाठी शासन तिजोरीतून एकूण 3.5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. शनिवार, 29 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सुरू झालेला हा उपक्रम दुपारी 3 वाजता यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.
या उपक्रमात जेष्ठ नागरिक कट्टा संयोजक सुरेश लिमये, समाजभूषण सुरेंद्र घुडे, संस्थेचे खजिनदार प्रमोद शेट रेडीज, अरविंद वांडरकर, शिरीष वारांग, सुरेंद्र शेट्ये, दत्ताराम लिंगायत, अविनाश गावंडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांना ही माहिती उशिरा मिळाल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे भविष्यात पुन्हा असे शिबीर आयोजित करण्याची मागणी करण्यात आली असून, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले.