मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : ज्येष्ठ नागरिकांसाठी अयोध्या तीर्थयात्रा
रत्नागिरी : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र 800 ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. 26 एप्रिल रोजी ही विशेष रेल्वे प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्याकडे प्रयाण करणार आहे. या वेळी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व धर्मीय 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले, त्यानुसार पात्र 800 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथमच सुरू होणारी ही विशेष तीर्थयात्रा 26 एप्रिल रोजी राजापूर रोड स्थानकावरून सुरू होणार असून रत्नागिरी रेल्वे स्थानकावर यात्रेकरूंना औपचारिक शुभेच्छा देण्यात येणार आहेत. या यात्रेमुळे ज्येष्ठ नागरिकांना अध्यात्मिक लाभ मिळेल तसेच त्यांच्या आनंदात वाढ होईल. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.