दुचाकी खरेदीसोबत दोन हेल्मेट मोफत देणे बंधनकारक!
मुंबई : मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यापुढे राज्यातील सर्व दुचाकी विक्रेत्यांना प्रत्येक दुचाकी विक्रीवेळी खरेदीदारास दोन हेल्मेट मोफत देणे अनिवार्य असेल. तसेच वाहन नोंदणी प्राधिकरणाने वाहन नोंदणीसाठी सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये हेल्मेट पुरविण्याचा उल्लेख असल्याची खातरजमा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील दुचाकीस्वारांनी आणि त्यांच्या मागे बसणाऱ्या व्यक्तींनी हेल्मेटचा वापर करावा, जेणेकरून अपघातातील जखमांची तीव्रता कमी होऊ शकेल. परिवहन विभागाने हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
“वाहन घेतले की हेल्मेट मिळालेच पाहिजे,” हा निर्णय सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
वार्तांकन – निलेश रहाटे, रत्नागिरी