स्तुत्य उपक्रम: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाकडून पोलीस कल्याण निधीसाठी आर्थिक मदत
देवरुख, ता. संगमेश्वर – सामाजिक जाणिवेतून प्रेरित होत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ दरवर्षी ‘फटाके कमी वाजवा आणि सैनिक/पोलीस कल्याण निधीला मदत करा’ या संदेशाचा प्रचार करत दिवाळीच्या काळात विशेष उपक्रम राबवते. यावर्षीही या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या निधीतून तब्बल ४५ हजार रुपयांची रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी देण्यात आली आहे.
दि. ३ एप्रिल रोजी या निधीचा धनादेश देवरुख पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शबनम मुजावर यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या वेळी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, कार्यवाह शिरीष फाटक, तसेच न्यू इंग्लिश स्कूल देवरुखचे मुख्याध्यापक कोकणी सर उपस्थित होते. यासह पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक निखिल पाटील, उपनिरीक्षक शबनम मुजावर आणि संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सामाजिक जाणिवेचे व कार्याचे कौतुक केले. मंडळाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये हुतात्मा जवानांप्रती कृतज्ञता व देशसेवेची प्रेरणा जागृत होते, असे भागवत यांनी नमूद केले.
हा उपक्रम देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ गेली अनेक वर्षे सातत्याने राबवत असून, समाजमनात राष्ट्रभक्ती व जबाबदारीची भावना निर्माण करणाऱ्या या स्तुत्य कार्याबद्दल सर्व स्तरातून गौरव व्यक्त केला जात आहे.