आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन.
गुरुकुल इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने दोन महिन्यांचे प्रशिक्षण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तळवली (मंगेश जाधव)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ प्लंबिंग टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या पहिल्या बॅचसाठी दोन महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रशिक्षणाचे सत्र देवरुख व पुणे येथे होणार असून, यासाठी महाविद्यालयात सुसज्ज कार्यशाळा व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, डॉ. चंद्रशेखर केदारी, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्यासह गुरुकुल संस्थेचे श्री. सोमनाथ कुलकर्णी व तांत्रिक प्रमुख सुरज पाटील उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक प्रा. विकास शृंगारे, प्रा. डॉ. मयुरेश राणे, प्रा. अभिनय पातेरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी आयोजनासाठी तांत्रिक सहाय्यक संतोष जाधव, कार्यालयातील किरण चाचे, सहाय्यक हेमंत कदम, अमोल वेलवणकर आणि विलास तावडे यांनी परिश्रम घेतले.