मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरे यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट; मराठी वापरासंदर्भात सविस्तर चर्चा
मराठी भाषेच्या सन्मानासाठी शासन कटिबद्ध; बँका आणि जनतेच्या संपर्कातील संस्थांमध्ये मराठीत व्यवहार अनिवार्य करण्यावर भर
मुंबई | प्रतिनिधी
मराठी भाषा आणि उद्योग विभागाचे मंत्री मा. उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. राज्यात सध्या मनसेतर्फे मराठी भाषेच्या वापरावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
या भेटीत मराठी भाषेच्या वापराबाबत मनसेने मांडलेल्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सामंत म्हणाले, “मराठी भाषा विभागाचा मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने राजसाहेबांची भेट घेतली. त्यांनी बँका व इतर जनतेच्या संपर्कातील संस्थांमध्ये मराठी वापराबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. या सूचना मी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. शिंदे आणि मा. अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे.”
मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्रात विविध भाषा बोलल्या जात असल्या तरी मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये यासाठी शासन कटिबद्ध आहे. मराठीचा सन्मान राखणं हीच राजसाहेबांची आणि शासनाची भूमिका आहे.”
औद्योगिक क्षेत्रात सक्तीने मराठी लादण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, सामंत म्हणाले, “जगभरातून येणाऱ्या गुंतवणूकदारांना मराठी शिकण्यासाठी प्रेरित केलं जाईल. पण बँका व जनतेच्या संपर्कातील संस्थांमध्ये मराठीत व्यवहार होणं आवश्यक आहे.” यासाठी लवकरच जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यवाही ठरवली जाणार आहे.
राज्यात स्थापन करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन समित्यांची बैठक पुढील आठवड्यात बोलावण्यात येणार असून, मराठीचा वापर टाळणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
“भयमुक्त वातावरणात, कायद्याच्या चौकटीत राहून मराठी भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे. कोणत्याही संस्थेने घाबरण्याचं कारण नाही. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ नये,” असं आवाहनही मंत्री सामंत यांनी यावेळी केलं.