ट्रम्प-मस्क यांच्या धोरणांवर अमेरिकन नागरिकांचा संताप; देशभरात १२०० ठिकाणी निदर्शने
सरकारी नोकरी कपात, स्थलांतर धोरण, सामाजिक सुरक्षा निधी कपात याविरोधात नागरिकांचा आक्रोश; १५० हून अधिक संघटनांचा सहभाग
वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली घेतल्या गेलेल्या विविध निर्णयांमुळे देशात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी अमेरिकेतील तब्बल १२०० शहरांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. ‘हॅन्ड्स ऑफ’ अशा घोषणा देत, हातात निषेधाचे फलक घेऊन नागरिकांनी सरकारविरोधी निदर्शने केली.
गेल्या काही आठवड्यांपासून ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या काही कठोर निर्णयांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधातील कारवाई, आयात शुल्कात वाढ, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात हे मुद्दे प्रामुख्याने आहेत. गृह विभाग, ऊर्जा, कृषी, आरोग्य, माजी सैनिक व्यवहार, मानवी सेवा यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये नोकरकपात करण्यात आल्यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर आर्थिक अस्थिरतेची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी प्रशासनाच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली आहे. काही निदर्शकांनी, “डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला जागतिक मंदीकडे ढकलण्याचा धोका निर्माण केला आहे,” असे ठामपणे सांगितले.
विशेष म्हणजे या आंदोलनात नागरी हक्क संघटना, वकील संघटना, कामगार संघटनांसह सुमारे १५० हून अधिक सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. ट्रम्प आणि मस्क यांच्या धोरणांवर टीका करत निदर्शकांनी सरकारला इशारा दिला की, लोकशाहीत जनतेच्या मताची किंमत असते.
एलॉन मस्क यांच्या सल्ल्याने ट्रम्प प्रशासनाने सामाजिक सुरक्षा प्रशासनाची प्रादेशिक कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ट्रान्सजेंडर संरक्षण आणि आरोग्य योजनांसाठी निधी कपात करण्यात आला आहे. स्थलांतरित नागरिकांवर वाढत्या कारवाईमुळेही अनेकांचे जीवन धोक्यात आले आहे.
या सर्व निर्णयांविरोधात देशभरात एकजूट दाखवत नागरिकांनी ‘ट्रम्प-मस्क हटाव’चा नारा दिला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, हे आंदोलन देशभर पसरत असून पुढील काळात या विरोधाला अधिक उग्र रूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.