श्री क्षेत्र पारगाव सुद्रिक येथे १६ ते १७ एप्रिल रोजी सुद्रिकेश्वर महाराज यात्रा उत्सव
धार्मिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक, कुस्ती स्पर्धा व तमाशाचा थाटात समावेश
आहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडेपाटील) – श्रीगोंदा तालुक्यातील प्रसिद्ध बागायतदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पारगाव सुद्रिक येथे श्री सुद्रिकेश्वर महाराज यात्रा १६ व १७ एप्रिल २०२५ रोजी पार पडणार आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
श्री सुद्रिकेश्वर महाराज हे पारेश्वर ऋषींचे शिष्य असून, हे क्षेत्र प्राचीन इतिहास व अध्यात्मिक वारसा लाभलेले आहे. गावाच्या मंदिराचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे पोथीपुराणांमध्ये नमूद आहे. सध्या या मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून सुरू असून, अंदाजे ७-८ कोटी खर्च अपेक्षित आहे.
यात्रेचा कार्यक्रम:
१६ एप्रिल: पहाटे नवस आणि दंडवत कार्यक्रम, दुपारी शिरण्या व संध्याकाळी सुद्रिकेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक, रात्री १२ वाजेपर्यंत फटाक्यांची आतषबाजी.
१७ एप्रिल: दुपारी ४ ते ६ दरम्यान कुस्तीचा आखाडा होणार असून, विविध वजनगटांतील कुस्त्या रंगणार आहेत. रात्री ९ ते ११ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकनाट्य कलाकार साहेबराव पाटील नांदवेळकर यांचा मोफत तमाशा आयोजित करण्यात आला आहे.
पारगाव सुद्रिक हे आहिल्यानगरपासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असून, पुणे, श्रीगोंदा व शिरूर येथून येथे बससेवेची सोय आहे. यात्रा काळात लाखोंच्या संख्येने भाविक श्री सुद्रिकेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात.
—
#पारगावसुद्रिक #सुद्रिकेश्वरमहाराज #यात्रा२०२५ #श्रीगोंदातालुका #धार्मिककार्यक्रम #कुस्तीआखाडा #लोकनाट्य