इंग्लंडच्या कौंटी क्रिकेट लीगमध्ये रत्नागिरीचा अविराज गावडे; मिडलसेक्स संघातून खेळणार!
रत्नागिरीचा युवा फिरकीपटू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर; कौंटी आणि प्रीमियर लीगमध्ये करणार जबरदस्त हजेरी
रत्नागिरी, १४ एप्रिल : रत्नागिरीच्या क्रिकेट इतिहासात अभिमानास्पद क्षण. जिल्ह्यातील अविराज अनिल गावडे हा इंग्लंडमधील प्रतिष्ठित कौंटी क्रिकेट लीगमध्ये सहभागी होणार असून, मिडलसेक्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. याशिवाय तो इंग्लंडच्या प्रीमियर क्रिकेट लीगमध्येही खेळणार आहे.
कौंटी लीग ही युरोपातील सर्वोच्च दर्जाची निवडचाचणी स्पर्धा असून, याच माध्यमातून देशांतर्गत संघांची निवड केली जाते. अविराज १० मे ते ६ सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत कौंटी लीगचे १६ आणि प्रीमियर लीगचे ३० सामने खेळणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या ‘ए डिव्हिजन’ स्पर्धेत दमदार लेगस्पिन फिरकीने त्याने आपल्या प्रतिभेची छाप पाडली. सध्या तो मेट्रो क्रिकेट क्लबमध्ये कोच निरंजन गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.
२० वर्षीय अविराजने रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १४ व १६ वर्षांखालील संघांचे नेतृत्व करताना राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. विशेषतः भारताच्या १६ वर्षांखालील पश्चिम विभाग संघात झालेली निवड हा रत्नागिरीसाठी ऐतिहासिक क्षण ठरला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या लीग स्पर्धेत ८१ विकेट्स आणि ‘इनव्हायटेशन लीग’मध्ये ४० विकेट्ससह २०६ धावा करून त्याने अष्टपैलू क्षमतेचा ठसा उमठवला. २०२२ मध्ये MCA १६ वर्षांखालील स्पर्धेत एका सामन्यात ६ आणि ४ अशी १० विकेट्स घेऊन निवड समितीचे लक्ष वेधले होते.
रत्नागिरीचा हा चमकता तारा आता इंग्लंडच्या मैदानावर झळकणार असल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
—
#अविराजगावडे #RatnagiriCricket #CountyCricket #MiddlesexCricket #UKCricket #LegSpinTalent #CricketNewsMarathi #रत्नागिरी #CricketFuture
—